जळगाव- जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली. ही सभा अपेक्षे प्रमाणे वादळी ठरली. सोशल मीडियावर संस्थेची बदनामी केल्याचा ठपका ठेवत माजी संचालक रावसाहेब मांगो पाटील यांच्यासह योगेश सनेर यांचे सदस्यत्त्व रद्द करण्याचा सभेपुढे प्रस्ताव मांडण्यात आला होता. याबाबत सभेत मोठा गदारोळ झाला. मात्र, सत्ताधाऱ्यांनी विषय पत्रिकेवरील १३ विषयांना तातडीने मंजुरी देत अवघ्या १५ मिनिटात सभा गुंडाळली.
सभेच्या सुरुवातीला अध्यक्ष मनोज पाटील यांनी वर्षभराच्या कामकाजाचा आढावा मांडला. नेहमीप्रमाणे संस्थेकडून छापण्यात येणारा अहवाल न छापता केवळ चार पानी अहवाल छापल्याने यावर्षी संस्थेने ११ लाखांची बचत केल्याचा दावा त्यांनी केला. सहकार कायद्यातील नवीन सूचनेप्रमाणे यावर्षी संस्थेला १०० कोटी रुपयांचा ठेवी परत करावा लागल्याने झालेल्या नफ्यात १ टक्के घट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगामी वर्षभरात संस्थेत ५० लाख रुपयांची बचत करून दाखविण्याची हमी देखील त्यांनी दिली.
दोन सदस्यांचे सदस्यत्त्व रद्द करण्यावर सभेत जोरदार गोंधळ
अध्यक्षांचे प्रास्ताविक संपल्यानंतर सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या १३ ठरावांवर चर्चा सुरु झाली. पहिल्या १२ ठरावांना सत्ताधारी संचालकांकडून मंजुरी देण्यात आली. त्यानंतर रावसाहेब पाटील व योगेश सनेर या दोन सदस्यांचे सदस्यत्त्व रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला. त्यावर रावसाहेब पाटील यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध नोंदवला. यामुळे सभेत चांगलाच गोंधळ निर्माण झाला. हा वाद पोलिसांकडून आटोक्यात आणला जात असताना, सत्ताधाऱ्यांनी गोंधळात या ठरावाला बहुमताने मंजुरी दिल्याने गोंधळात अधिक भर पडली. त्यामुळे सभागृहात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना धक्के मारून बाहेर काढले
रावसाहेब पाटील यांच्या प्रगती गटाकडून जोरदार घोषणाबाजी होत असताना, सत्ताधाऱ्यांनी कोणत्याही विषयावर चर्चा न करता सभेचा समारोप करत राष्ट्रगीताला सुरुवात केली. राष्ट्रगीत सुरू करण्याबाबतची पूर्वसूचना यावेळी देण्यात आली नव्हती. या गोंधळातच राष्ट्रगीत आटोपण्यात आले. त्यामुळे सभा संपल्यानंतरही विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरुच होती. पोलिसांनी वाद शांत करण्यासाठी प्रगती गटाच्या सदस्यांसह इतरांना सभागृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, काही सदस्यांकडून कागदपत्रे व्यासपीठाकडे फेकण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना धक्के मारून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
प्रगती गटाच्या काही सदस्यांनी नूतन मराठा महाविद्यालयाच्या मैदानावर घेतली जाहीर सभा
सर्वसाधारण सभा संपल्यानंतर विरोधकांना बोलू न दिल्याने प्रगती गटाच्या काही सदस्यांनी नूतन मराठा महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा घेतली. तेथे त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कृतीचा निषेध केला. तसेच रावसाहेब पाटील व योगेश सनेर यांचे रद्द केलेले सदस्यत्त्वाचा ठराव रद्द करण्याची मागणी केली. या विरोधात न्यायालयीन लढा देण्याचा ठराव या जाहीर सभेत घेण्यात आला. तसेच बोगस नोकरभरतीबाबत देखील सत्ताधाऱ्यांविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
दरम्यान शहरातील नूतन मराठा महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही सभा पार पडली होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष शामकांत भदाणे, विलास नेरकर, सत्ताधारी गटनेते तुकाराम बोरोले, अनिल पाटील, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.