जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. हा मृत्यूदर रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत काही ठिकाणी मोठी ऑपरेशन्स करावी लागणार आहेत. तीच ऑपरेशन्स करायला मी जळगावात आलोय, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा राज्यात सर्वाधिक असल्याने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजेश टोपे आज जळगावच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी अजिंठा विश्रामगृहात 'ईटीव्ही भारत'ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. येथील मृत्यूदर देखील अधिक असल्याने या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी जळगावात आलो आहे. या दौऱ्यात मी शासकीय कोविड रुग्णालयांसह अधिग्रहित केलेल्या खासगी रुग्णालयांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. डॉक्टर्स, नर्स त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी यांच्याही भेटी घेऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेणार आहे. लोकप्रतिनिधी यांच्याशी देखील बैठका घेऊन जिल्ह्यातील उपाययोजनांमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात वेगाने सुरू असलेला कोरोनाचा संसर्ग रोखणे आणि मृत्यूदर देखील आटोक्यात आणणे, हे दोन प्रमुख उद्देश घेऊन आज जळगावात आलो आहे. हे उद्देश साध्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेत काही ठिकाणी मोठी ऑपरेशन्स करावी लागणार आहेत, ती करण्यासाठीच जळगाव दौरा केला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात निश्चितच आपल्याला यश येईल, असा विश्वासही राजेश टोपे यांनी व्यक्त केला.