जळगाव - शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांगांची फरपट सुरू आहे. शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक असलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. एवढेच नाही, तर त्यांना महाविद्यालयाच्या खेट्याही घालाव्या लागत आहेत.
अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू झाली आहे. मात्र, यासंदर्भात महाविद्यालयाकडून नीट माहिती दिली जात नाही. कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून टोलवाटोलवी केली जात आहे.
वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेकांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दर आठवड्याला बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी केली जाते. या दिवशी निर्धारित वेळेत सुमारे सव्वाशे ते दीडशे रुग्णांची तपासणी करण्याचे नियोजन असते. परंतु, जिल्हाभरातील रुग्ण एकाच दिवशी तपासणीसाठी येत असल्याने नेहमी रुग्णसंख्या जास्त असते. त्यामुळे रांगेत असूनही अनेकांची तपासणी होत नाही. त्यांना माघारी जावे लागते.
अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बुधवार हा वार निश्चित करण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक तसेच विषयतज्ज्ञ, अशी तीन सदस्यीय समिती रुग्णांची तपासणी करते. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व वैद्यकीय तपासणी झाल्यावर संबंधित दिव्यांगाचा प्रस्ताव ऑनलाइन पध्दतीने प्रमाणपत्र प्रदान करणाऱ्या कंपनीच्या संकेतस्थळावर अपलोड केला जातो. त्यानंतर कंपनी त्या व्यक्तीला घरपोच प्रमाणपत्र पाठवते. ही प्रणाली चार महिन्यांपूर्वीच सुरू झाली असून, त्यात काही तांत्रिक त्रुटी असल्याने अनेकांना प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत आहेत.
या प्रकारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कोणताही दोष नसल्याचे स्पष्टीकरण महाविद्यालय प्रशासनाने दिले आहे. अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या दिव्यांगांची संख्या लक्षात घेता महाविद्यालय प्रशासनाने आठवड्यातून किमान ३ ते ४ दिवस तपासणीसाठी सुरू करावेत. ज्या ठिकाणी दिव्यांगांची तपासणी होते, तेथे सोयीसुविधा पुरवाव्यात, अशा मागण्या दिव्यांगांकडून होत आहेत.