जळगाव: माजी मंत्री सुरेश जैन यांना जामीन मिळाल्यावर तब्बल 10 वर्षांनी ते जळगावत परतले, यावेळी आज सुरेश जैन यांच्या बंगल्यावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. सुरेश दादांनी राजकारणाच्या मैदानात यायलाच हवं, दादांचे बोट पकडून आम्ही राजकारणामध्ये आलो, आज दादांचे दर्शन झालं मी स्वतःला भाग्यशाली समजतो.
मोठ्या जल्लोषात स्वागत: लोकांच्या म्हणण्यावरून असं वाटतंय की ते राजकारणात यायला पाहिजे. पण शेवटी त्यांचा हा वैयक्तिक विषय आहे, असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सुरेश जैन यांचे रेल्वे स्थानकावर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. जळगाव मधील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यातील मुख्य संशयित माजी मंत्री तथा शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांना नियमित जामीन मंजूर झाल्यानंतर तब्बल 10 वर्षांनी सुरेश जैन यांचे जळगावात आगमन झाले आहे.
प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले: याप्रसंगी जळगाव रेल्वे स्थानकावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह महापौर, उपमहापौर, व विविध पक्षाच्या पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले आहे. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकावर स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. तर सुरेश जैन यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात रांगोळ्या ढोल- ताशे फटाक्यांची आतिषबाजी फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले आहे. घरकुल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांना 2012 मध्ये अटक झाली होती.
नियमित जामीन मंजूर: दरम्यान यापूर्वी त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र जळगाव जिल्ह्यात येण्यास त्यांना बंदी घालण्यात आली होती. दरम्यान 30 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सुरेश जैन यांचा विनाअटी शर्तीवर नियमित जामीन मंजूर केला असून त्यामुळे सुरेश जैन हे जळगावात परतले आहेत. दरम्यान याप्रसंगी बोलताना सुरेश जैन यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार नसल्याचे म्हटले आहे. मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार असल्याचे माजी आमदार सुरेश जैन यांनी स्पष्ट केले आहे.