जळगाव - शहरातील कचरा संकलनासह स्वच्छतेचा ठेका घेणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीने कचरा संकलन करणाऱ्या ८५ घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे आता ठरवून दिलेल्या मार्गावरून घंटागाड्या कचरा संकलन करतात किंवा नाही, यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. जीपीएस यंत्रणेमुळे घंटागाड्यांचे लोकेशन ट्रॅक होणार असल्याने गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
हेही वाचा... मुंबई : दहिसर येथे वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा
जळगाव शहर महापालिकेने शहरातील दैनंदिन कचरा संकलन तसेच स्वच्छतेसाठी ५ वर्षांच्या कालावधीचा ७५ कोटींचा एकमुस्त ठेका नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला दिला आहे. गेल्या ४ महिन्यापांसून शहरात मक्तेदाराकडून सफाईचे काम सुरू आहे. महापालिका व मक्तेदार यांच्यात झालेल्या करारानाम्यात घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार वॉटरग्रेस कंपनीने सर्व ८५ घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसवली असून ती कार्यान्वित करण्यात आली आहे.
हेही वाचा... निर्भया हत्याकांड: सर्वोच्च न्यायालय 17 डिसेंबरला पुनर्याचिकेवर देणार निर्णय
घनकचरा प्रकल्प अंतर्गत महापालिकेने शहरातील दैनंदिन कचरा घराघरातून संकलनासाठी जीएम पोर्टलवरून ८५ घंटागाड्या खरेदी केलेल्या आहेत. या गाड्या सफाई मक्तेदाराला भाड्याने दिल्या आहेत. प्रत्येक घंटागाडीचा प्रभागानुसार मार्ग ठरवला आहे. त्यानुसार कचरा संकलनाचे काम वेळेत होते का, याचे जीपीएस यंत्रणेवरून बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसविल्याने सर्व घंटागाड्या दिलेल्या मार्गानुसार दिलेल्या वेळेत जावून कचरा संकलन होते का नाही, हे समजणार आहे. त्यामुळे घंटागाडी दिलेल्या ठिकाणी न जाणे, अथवा वेळेत न जाणे असे प्रकार या यंत्रणेमुळे कमी होवून कचरा संकलनाचा कामाचा दर्जा नक्कीच सुधारण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा... हैदराबाद चकमक: सहा महिन्यांत अहवाल द्या, तीन सदस्यीय चौकशी समीतीची सर्वोच्च न्यायालयानं केली स्थापना
आरोग्य विभागातून असणार नियंत्रण
महापालिकेच्या आरोग्य विभागात जीपीएस यंत्रणेचे कंट्रोल रुम ठेवण्यात आले आहे. यात मक्तेदाराचा तांत्रिक काम पाहणारा कर्मचारी व महापालिकेचा कर्मचारी परस्पर समन्वयातून काम पाहत आहे. वाहन कुठे, किती वेळ थांबले, याचा सर्व तांत्रिक अहवाल दररोज अपडेट केला जात आहे.