जळगाव - परतीच्या पावसाने राज्यात ठिकठिकाणी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरकारने तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळ तसेच विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे संभाव्य हानी लक्षात घेऊन सरकारने उपाययोजना कराव्यात, असेही खडसे म्हणालेत.
एकनाथ खडसे मुक्ताईनगर येथे त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी चर्चा करताना बोलत होते. ते पुढे म्हणाले, यावर्षी राज्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यानंतर आता परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. पुढचे काही दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यादृष्टीने सरकारने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा- जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार असेल तर तो बाहेर येईलच- एकनाथ खडसे
शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज..
शेतकऱ्यांच्या परिस्थिती विषयी बोलताना खडसे म्हणाले की, गेल्या 75 वर्षात शेतकऱ्यांच्या जीवनमानात फार बदल झालेला नाही. पूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत होता. आता तो आधुनिक शेतीकडे वळला आहे. परंतु, आधुनिक शेती करत असताना त्याचा निसर्गाशी सामना सुरू आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. म्हणूनच शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. यात बदल व्हायला हवा. सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र, आजही अनेक शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ झालेले नाही. सरकार मदतीसाठी निर्णय घेते. पण शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळत नाही, अशी अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे. सरकारने त्याला अडचणीच्या काळात मदत केली पाहिजे. आजवर अनेक सरकार आले आणि गेले. मात्र, शेतकऱ्यांची परिस्थिती आपण बदलू शकलो नाही, हे आपले अपयश आहे. पुढील कालखंडात तरी शेतकऱ्यांना बळ देण्याची गरज आहे, असेही मत खडसे यांनी यावेळी व्यक्त केले.
हेही वाचा- ETV ETV ETV खडसेंचं ठरलं! घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश?