जळगाव - विजयादशमी म्हणजेच, दसऱ्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणले जाते. दसर्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते. या दिवशी अनेक ग्राहक सोने खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात गर्दी करतात. मात्र, जळगावातील सुवर्ण बाजारात यावर्षी काहीसे उलट चित्र आहे. दसऱ्याच्या दिवशीही सुवर्ण बाजारात शुकशुकाट आहे.
सोन्याच्या वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांमुळे जळगावची विशेष ओळख आहे. यावर्षीही आकर्षक दागिने सराफ दुकानांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सराफ पेढी चालकांकडून विविध योजनाही जाहीर केल्या आहेत. मात्र, तरीही दसऱ्याच्या दिवशी सकाळपासून सुवर्ण बाजारात उलाढाल संथगतीने सुरू आहे. आज सोन्याचा भाव 51 हजार 600 (3 टक्के जीएसटी वगळून) रुपये प्रति तोळा आहे.
आपट्याच्या आकाराची सोन्याची पाने उपलब्ध - दसर्यानिमित्त अनेक सराफी पेढ्यांनी आपट्याच्या आकाराच्या सोन्याची पाने विक्रीसाठी ठेवली आहेत. ही सोन्याची पाने अर्धा ग्रॅम ते दोन ग्रॅम वजनात उपलब्ध आहेत. जळगाव सुवर्ण बाजाराचे हे प्रमुख वैशिष्ट मानले जाते. मात्र, सध्या व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा असल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिक सिद्धार्थ बाफना यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.