जळगाव - कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून सुवर्ण बाजार अस्थिर झाला होता. आता अनलॉकमुळे सुवर्ण बाजार हळूहळू सुरळीत होऊ लागल्याने सोने-चांदीचे भाव कमी होण्यासही मदत होत आहे. त्यामुळेच गेल्या आठवड्यात साडेतीन हजार रुपयांनी वाढ झालेल्या चांदीच्या भावात १२०० रुपये प्रतिकिलोने घसरण होऊन ती ६३ हजार ३०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे. तसेच सोन्याच्याही भावात ६०० रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार रुपये प्रतितोळ्यावर आले आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने सोने-चांदीच्या दरांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊन सुवर्ण बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. त्यानंतर लाॅकडाऊनमुळे तर बाजारपेठ बंदच राहिली. नंतरही सट्टाबाजारामुळे सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून आवकही सुरळीत होऊ लागली आहे. त्यामुळे आता सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीला मागणी वाढली असताना भाव कमी होत आहेत. याचा ग्राहकांना लाभ होत असून सुवर्ण व्यावसायिकांनाही व्यवसाय वाढीसाठी मदत होत असल्याचे सांगितले जात आहे.
आवक सुरळीत झाल्याने सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुवर्ण बाजार उघडताच चांदीच्या भावात एक हजार २०० रुपयांनी घसरून ती ६३ हजार ३०० रुपये प्रतिकिलोवर आली. तसेच सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार रुपये प्रतितोळ्यावर आले. अधिक मासामुळे सोने-चांदीला चांगलीच मागणी वाढली आहे. त्यात सोने-चांदीचे भाव कमी झाल्याने ग्राहकांची खरेदीला पसंती दिसून येत आहे. आता सणासुदीच्या काळातही मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.