जळगाव - ऐन लग्नसराईत जळगावातील सुवर्णबाजारात मोठा बदल दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उच्चांकी भाव असलेले सोने व चांदीची चमक फिकी पडताना दिसून येत आहे. शुक्रवारी घसरणीनंतर सोने-चांदीच्या भावात शनिवारी पुन्हा मोठी घसरण झाली आहे.
गेल्या आठवड्यात सोने-चांदीचे दर सातत्याने वाढले होते. शनिवारी सोने-चांदीच्या दरात पुन्हा शुक्रवारपेक्षा मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो एक हजार ५०० रुपयांनी घसरण होऊन चांदी प्रति किलो ६८ हजार ५०० रुपये आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा ५०० रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोने प्रति तोळा ४६ हजार ६०० रुपयांवर आले.
हेही वाचा-तीन दिवसांच्या 'ब्रेक'नंतर इंधनाच्या दरात पुन्हा वाढ
सोने पुन्हा ४७ हजारांच्या खाली-
गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात वाढ कायम असल्याने सोने ४७ हजारांच्या पुढेच होते. मात्र, १९ फेब्रुवारीला सोने ४६ हजार ९०० रुपयांवर आले. त्यानंतर ते सतत ४७ हजारांच्या पुढेच होते. शनिवारी पुन्हा सोने प्रति तोळा ४६ हजार ६०० रुपयांवर येऊन दर ४७ हजारांच्या खाली आहेत.
हेही वाचा-वैयक्तिक गोपनीयतेचा भंग; टिकटॉक अमेरिकेतील राज्याला देणार ९२ दशलक्ष डॉलर
ऐन लग्नसराईत सोने-चांदीच्या दरात घसरण
सध्या लग्नसराई सुरू आहे. या काळात सोने व चांदीचे दर वाढतात, असा आजवरचा अनुभव आहे. परंतु, यावर्षी सुवर्णबाजारात उलट परिस्थिती आहे. लग्नसराई सुरू असताना सोने व चांदीचे दर घसरले आहेत. घटलेली मागणी तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेला सट्टा ही त्या मागची कारणे असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत. अशा परिस्थितीत लग्नाचे दागिने तसेच आभूषणांना मागणी कमी झाली आहे. याचाही सुवर्ण बाजारावर परिणाम झाला आहे.