जळगाव - मुलींचा घटता जन्मदर लक्षात घेता जळगाव महापालिकेने एक किंवा दोन मुली असलेल्या मालमत्ताधारक पालकांना मालमत्ताकरात १ टक्का करसवलत जाहीर केली आहे. अनेक पालक महापालिकेच्या या सवलतीचा लाभ घेताना दिसत आहेत.
जळगाव जिल्ह्यात मुलांच्या तुलनेने मुलींच्या जन्मदरात हजारी ९९ एवढी घट आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या स्त्री भ्रुणहत्येमुळे मुलींच्या जन्मदरात होणारी ही घट लक्षात घेता जळगाव महापालिकेने मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी कंबर कसली आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या उद्देशाने जळगाव महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. एक किंवा दोन कन्यारत्न असलेल्या मालमत्ताधारक पालकांना घरपट्टी तसेच पाणीपट्टीत एक टक्क्याने सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी यापूर्वीही महापालिकेने असाच एक अभिनव निर्णय घेतला होता. पहिल्या किंवा दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या पालकांना मालमत्ताकरात तब्बल दोन टक्के सूट देण्यात येत आहे. या निर्णयासोबतच आता पुन्हा कन्यारत्न असलेल्या पालकांना करसवलत जाहीर करण्यात आली आहे.
महापालिकेच्या निर्णयाचे स्वागत -
पालकांनी महापालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. शहरातील अनेक मालमत्ताधारक पालक महापालिकेच्या या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी महापालिकेने उचललेले पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
यापुढेही उपक्रम राबविण्याचा मानस -
जन्माला आलेल्या कन्यांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी अनेक विधायक उपक्रम यापुढेही राबविण्याचा महापालिकेचा मानस आहे, असे स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी सांगितले.