जळगाव - अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तुमचा शपथविधी राहू द्या, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री तसेच तुम्ही शपथ घेऊ नका. आधी शेतकऱ्यांच्या मदतीचे काय ते बघा, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी गिरीश महाजनांना घेराव घालत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
गिरीश महाजन यांनी शनिवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि यावल तालुक्यातील 2 ते 4 गावांमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा रोष पाहून दौरा आटोपता घेतला.
हेही वाचा - अवकाळी पावसाने शेती 'पाण्यात'; गिरणा धरणातून विसर्ग सुरू
अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी गिरीश महाजन शनिवारी सायंकाळी मुंबईहून विशेष विमानाने जळगावात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी जळगाव शहरापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावरील मोजक्या गावांमध्ये पाहणी केली. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीला उशीर केल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महाजन यांच्या समोर जाहीर नाराजी व्यक्त केली.
गिरीश महाजन यांनी या दौऱ्यात जळगाव तालुक्यातील ममुराबाद, विदगाव तसेच यावल तालुक्यातील काही गावांच्या शेतशिवारात खराब झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी काही शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीबाबत माहिती देऊन सरकारने मदतीचा हात देण्याची मागणी केली. त्यावर गिरीश महाजन यांनी, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टीमुळे राज्यभरात ओल्या दुष्काळाचे सावट आहे. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आजच मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, असे सांगितले.
हेही वाचा - औरंगाबाद-धुळे महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारच्या धडकेत दोन जण ठार
शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून राज्य सरकारने 10 हजार कोटी रुपये काढून ठेवले आहेत. पंचनामे झाल्यानंतरही राज्य सरकार वाढीव मदत करणार आहे. शिवाय केंद्रसरकार मदत करेल. पीकविमा कंपनीच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषांपलीकडे जाऊन मदत केली जाईल, असे आश्वासन महाजन यांनी यावेळी दिले.