जळगाव- जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाळीसगाव पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त केलेल्या वाळूच्या ट्रॅक्टरवर चक्क गांज्याची रोपे उगवली होती. या प्रकाराची वाच्यता होताच पोलिसांनी गुपचूप ही रोपे उपटून फेकून दिली. त्यानंतर असे काहीही घडले नसल्याचा आव आणला. दरम्यान, या प्रकाराची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चाळीसगाव तालुक्यात वाळूच्या आड गांज्याची तस्करी सुरू आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा-जळगावात पोलीस दलाकडून सायबर क्राईमविषयी जनजागृती
चाळीसगाव शहर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारे काही ट्रॅक्टर जप्त केले होते. जप्त केलेले ट्रॅक्टर पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेले होते. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यातील एका ट्रॅक्टरवर चक्क गांज्याची रोपे उगवल्याचे समोर आले. ही रोपे दोन ते तीन फुटाची होती. या प्रकाराची चर्चा सुरू होताच पोलिसांनी आपल्याला डोकेदुखी नको म्हणून गांज्याची रोपे उपटून फेकून दिली. या विषयासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. असा काहीही प्रकार घडला नसल्याची सारवासारव देखील पोलिसांनी केली. दरम्यान, या प्रकाराची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. मात्र, पोलीस नकार देत आहेत. या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काही समाजसेवक कार्यकर्त्यांनी केली आहे.
पोलिसांचा अजब तर्क-
वाळूच्या ट्रॅक्टरवर काम करणारे अनेक मजूर हे मद्यपान करणारे तसेच गांजा ओढणारे असतात. ट्रॅक्टरमध्ये वाळू भरताना एखाद्या मजुराने नशा करण्यासाठी गांजा हातावर मळला असेल. त्यावेळी गांज्याच्या बिया ट्रॅक्टरमधील वाळूत पडल्या असतील. हे ट्रॅक्टर जप्त केल्यानंतर ते बरेच दिवस पोलीस ठाण्यात उभे होते. त्यावर पाऊस पडल्याने त्यातून रोपे उगवली असतील, असा अजब तर्क या विषयासंदर्भात पोलिसांनी लढवला आहे.