जळगाव- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जळगावात रविवारी पेट्रोलचे दर २७ तर डिझेलचे दर ३४ पैशांनी वाढले. त्यामुळे जळगावात पेट्रोल ९६.२७ रुपये प्रतिलीटर तर डिझेल ८५.७६ रुपये प्रतिलीटर झाले आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट बिघडले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर अधिभार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर अधिभार लावण्याची घोषणा केली. त्यानुसार कृषी पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी पेट्रोलवर प्रतिलीटर अडीच रुपये तर डिझेलवर प्रतिलीटर चार रुपये अधिभार लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात लावलेल्या अधिभारमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत.
पेट्रोल डिझेलचे दर शंभरीकडे-
पेट्रोलचे दर तर शंभरीच्या टप्प्यात आले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर याच आठवड्यात पेट्रोल शंभर रुपये प्रतिलीटर होईल. पेट्रोल पाठोपाठ डिझेलचे दरही शंभरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. इंधनाचे दर वाढले की महागाई आपोआप भडकते, त्यामुळे सरकारने इंधनाचे दर कमी करावेत, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.
आठवडाभरात भडकले दर-
जळगावात गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सुमारे ५ ते ६ रुपयांनी वाढले आहेत. रविवारी तर पेट्रोल २७ आणि डिझेल ३४ पैशांनी वाढले. आठवडाभरात ही सर्वात मोठी दरवाढ नोंदवण्यात आली आहे.