जळगाव - जिल्ह्यातील सावदा येथील एका ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाने कोरोना लढ्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस 5 हजार रुपयांची मदत केली आहे. हरचंद शिवराम भंगाळे (वय 95 वर्षे) असे या स्वातंत्र्यसैनिकाचे नाव आहे. भंगाळे यांनी मदतीचा धनादेश फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचेकडे सुपूर्द केला.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून डॉ. थोरबोले यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भंगाळे यांचे आभार मानले. तर सन 1925 साली जन्मलेल्या स्वातंत्र्यसैनिक भंगाळे यांनी आपला अनुभव सांगताना, 95 वर्षाच्या उभ्या आयुष्यात अशी परिस्थिती कधी अनुभवलेली नसल्याचेही सांगितले.
राज्यात सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सावदा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक हरचंद भंगाळे यांनी केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.