जळगाव - वाहन चालकांना पक्का परवाना देण्यासाठी शिबिरात खोटा उमेदवार उभा करण्यात आला होता. तसेच फॉर्मवर दुसर्या व्यक्तीचा फोटो चिकटवून शासनाची फसवणुक करणाचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध भुसावळ शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उप-प्रादेशिक परिवहन विभागातील मोार वाहन निरीक्षक घनश्याम दिलीप चव्हाण (रा. गणेश कॉलनी) हे ५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबरपर्यंत शिबिर दौर्यावर होते. २६ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला मोकळ्या जागेत मोटार वाहन निरीक्षक संदिप शांताराम पाटील यांच्यासह ते वाहनांचे पक्क्या परवान्यासाठी अर्जदाराची चाचणी घेत होते. यावेळी राजेश सिंधी उर्फ सुक्का हा त्याठिकाणी आला आणि त्याच्याकडील उमेदवारांचे अर्ज त्याने अधिकार्यांकडे दिले. या अर्जातील चेतन पांडुरंग पाटील यांच्या अर्जासह कागदपत्रांनी पाहणी केली असता त्याच्या फॉर्मवर संगणीकृत असलेला फोटो नसून त्याठिकाणी दुसरा फोटो चिकटविलेला आढळून आला.
बनावट उमेदवाराने केली स्वाक्षरी -
उमेदवार बनावट असल्याची कुणकुण लागताच अधिकार्यांनी राजेश सिंधी याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला ओळखपत्र दाखविण्याबाबबत विचारणा केली. मात्र, काहीच न बोलल्याने पाकिट घरी राहिले आहे, असे त्या बनावट उमेदवाराने सांगितले. त्यानंतर फॉर्मवर असलेली सही व बनावट उमेदवाराने केलेली सही यांची तुलना केली असता दोघांमध्ये फरक दिसून आला.
हेही वाचा - महाविकास आघाडीला घवघवीत यश; जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जल्लोष
दुसर्यांदाही केली तिच चूक -
थोड्या वेळानंतर पुन्हा राजेश सिंधी याने हेमंत नरेंद्र शर्मा व या दुसर्या उमेदवाराचा फॉर्म आणला. यावर देखील संगणीकृत फोटो ऐवजी दुसरा फोटो चिटकविलेला असल्याने त्याला याबाबत विचारणा केली. यावर 'जाने दोन साहब पास कर दो' असे तो म्हणाला. फोटोबाबत अधिकार्यांनी त्याला विचारणा केल्यास त्याने नजरचुकीने लावला गेले असल्याचे सांगितले.
कागदपत्रे फेकत केली अरेरावी -
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गणेश ढेंगे हा त्याठिकाणी आला. त्याने घनश्याम पाटील यांच्यासोबत अरेरावी करीत त्याच्या हातातील कागदपत्रे त्याने त्यांच्या टेबलावर फेकून दिली. तसेच माझ्या उमेदवारांचे अर्ज पास करुन द्या नाहीतर मी तुम्हाला कामाला लावेन, असे म्हणत अरेरावी करीत त्याठिकाणाहून तो निघून गेला. याबाबत अधिकार्यांनी घडलेला प्रकार वरिष्ठांना कळविल्यानंतर त्यांना याबाबत पोलिसात तक्रार देण्याच्या सुचना केल्या.
बनावट उमेदवारांसह दोघांवर गुन्हा दाखल -
राजेश सिंधी याने चंदन फकिरसिंग, हेमंत नरेंद्र शर्मा व चेतन पांडुरंग पाटील या तिघांच्या फॉर्मवर बनावट फोटो, स्वाक्षरी व बनावट उमेदवार करुन शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी या तिघांसह धमकी दिल्याप्रकरणी राजेश सिंधी उर्फ सिक्का, गणेश ढेंगे यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.