जळगाव - जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या कोळन्हावी गावातील 40 जणांना दूषित पाण्यातून विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या ग्रामस्थांना तातडीने जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
यावल तालुक्यातील कोळन्हावी हे सुमारे 2 हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावाला ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर तसेच तीन कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दुष्काळी परिस्थितीत देखील गावाला प्रत्येक दिवशी पाणीपुरवठा होत आहे. मात्र, गावात काही ठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील व्हॉल्व नादुरुस्त झाले आहेत. पाणीपुरवठा सुरू झाला की व्हॉल्वमधून पाणीगळती होते. गळतीमुळे साचलेले तसेच गटारींचे सांडपाणी व्हॉल्वमधून आत जलवाहिनीत शिरते. याच दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून गावातील काही ग्रामस्थांना उलट्या, जुलाब तसेच अतिसाराचा त्रास होत होता. यासंदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या. परंतु, ग्रामपंचायत प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आज सकाळी पाणीपुरवठा झाल्यावर गावातील 25 ते 30 जणांना दुपारपर्यंत उलट्या, जुलाब तसेच अतिसाराचा त्रास होऊ लागला. पाहता पाहता अनेकांना हा त्रास होऊ लागल्याने ग्रामस्थांनी गावाजवळ असलेल्या किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी धाव घेतली. त्रास जास्त होत असल्याने 40 रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रथमोपचार झाल्यावर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या रुग्णांवर सुरू आहेत उपचार-
प्रदीप बाळू सोळंके, वासुदेव बापू सोळंके, निशा प्रदीप सोळंके, शोभा रमेश सोळंके, कल्पना ज्ञानेश्वर सोळंके, ललिता गोरख सोळंके, शारदा बापू सोळंके, सुषमा जंगलू सोळंके, दिलीप आत्माराम सोळंके, भारती दिलीप सोळंके, अनुसूया सोळंके, ललित प्रकाश सोळंके, प्रदीप सुकलाल सोळंके, भागवत ढेमा सोळंके, गोरख राजू सोळंके, सरूबाई सोळंके, लताबाई भगवान तायडे, सुषमा जंगलू सोळंके, दगूबाई अभिमान सपकाळे, निर्मलाबाई महारु सैंदाणे, धीरज विलास सपकाळे यांच्यासह 40 जणांवर जिल्हा रुग्णालयातील विविध वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.