जळगाव - रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात असलेल्या एका शेतात अज्ञातांनी चार भावंडांची निर्घृण हत्या केली. हा खळबळजनक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
हत्येचे कारण अस्पष्ट -
सईता भिलाला (वय १२), रावल भिलाला (वय ११), अनिल भिलाला (वय ८) आणि सुमन ऊर्फ नानी (वय ३) अशी हत्या झालेल्या चौघांची नावे आहेत. या चौघांची हत्या नेमकी का झाली? याचे कारण समोर आलेले नाही. घटनास्थळी असलेली परिस्थिती पाहता हे हत्याकांड चोरीच्या उद्देशाने झाल्याचेही दिसून येत नाही. आज अमावस्या असल्याने बुवाबाजी किंवा अंधश्रद्धेतून हे हत्याकांड झाले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. अद्याप याबाबत कोणत्याही प्रकारचे पुरावे घटनास्थळी मिळालेली नाहीत. त्यामुळे या हत्याकांडाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.
रावेर शहरापासून काही अंतरावर बोरगाव शिवारात शेख मुश्ताक यांचे शेत आहे. मागील अनेक वर्षांपासून शेख यांच्या शेतात मयताब भिलाला हे आपली पत्नी, दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. नातेवाइकांच्या दशक्रिया विधीसाठी भिलाला हे पत्नी आणि एका मुलासह १५ ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशात गेले होते. त्यांची दोन मुले आणि दोन मुली घरीच होते. शुक्रवारी सकाळी शेतमालक शेख मुश्ताक हे शेतात आल्यानंतर त्यांना घर बंद दिसले. त्यामुळे त्यांनी आवाज देत डोकावून पाहिले असता, घरात भिलाला यांची चारही मुले रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. ही घटना समोर आल्यानंतर शेख यांनी तातडीने रावेर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पुराव्यांचे संकलन करण्यासाठी श्वानपथक तसेच फॉरेन्सिक लॅबचे पथकही दाखल झाले आहे.
'एसआयटी'मार्फत होणार घटनेची चौकशी -
अल्पवयीन मुलांची निर्घृणपणे हत्या होणे हे अत्यंत घृणास्पद असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांच्या नेतृत्वात या घटनेची चौकशी करण्यासाठी तातडीने एसआयटी नियुक्त करण्याचे आदेश त्यांनी दिले. सध्या या घटनेचा तपास जळगावचे सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा हे करत आहेत.
चार वर्षांपूर्वीच्या भादली हत्याकांडाची आठवण -
बोरखेडा येथील हत्याकांडाच्या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यातील भादली येथे चार वर्षांपूर्वी घडलेल्या सामूहिक हत्याकांडाची आठवण ताजी झाली आहे. अद्यापही भादली हत्याकांडाचा छडा पोलीस यंत्रणेला लावता आलेला नाही. त्यानंतर गेल्या वर्षी रावेर येथे एका खासगी बँकेच्या व्यवस्थापकाची बँकेत गोळीबार करत हत्या झाली होती. त्या घटनेचा देखील पोलिसांना तपास लावता आलेला नाही.