जळगाव - जिल्ह्यातील एरंडोलजवळ दोन वाहनांमध्ये झालेल्या धडकेनंतर एका गाडीतील प्रवाशांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. मात्र, या घटनेनंतर भयानक दु:खाची छाया पसरली असतानाही चार वर्षांची एक चिमुकली स्पष्ट जीवंत असल्याचं बघ्यांच्या निदर्शनास आलं. कोणी याला दैव म्हणेल, कोणी कर्म म्हणेल तर कोणी पाप-पुण्याचं मुल्यामापन करत बसेल मात्र ती बचावली हे एका भीषण संकटानंतरचं वास्तव आहे.
जिल्ह्यातील एरंडोल शहराजवळ ट्रक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळीत झालेल्या भीषण अपघातात काळी पिवळीतील 9 प्रवासी ठार झाले आहेत. तर अन्य 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, या 18 पेक्षा जास्त प्रवासी असलेल्या चारचाकीच्या या अपघातात 4 वर्षीय बालिका सुदैवाने बचावली आहे. सिमरन दुधभानसा खुसराम (वय 4, रा. छिंदवाडा) असे बचावलेल्या बालिकेचे नाव आहे. सिमरन ही वडील दुधभानसा खुसराम व आजी फुसीयाबाई सुरेशकुमार यांच्यासोबत चारचाकीत होती. अपघातानंतर सिमरन मात्र सुखरुपपणे चारचाकीतून बाहेर पडली. अजाण असल्यामुळे वडील, आजीचा अपघात झाल्याची कल्पना देखील तिला आलेली नाही. नागरिकांनी मृत झालेल्या प्रवाशांचे मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तर जखमींना जळगावात हलवले आहे. नागरिकांनी सिमरन हिला एरंडोल पोलीस ठाण्यात नेऊन सोडले होते. वडील दुधभानसा यांच्याकडून काही नातेवाईकांची नावे, संपर्क क्रमांक मिळवून रात्री उशिरा सिमरनला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तुळसाबाई महाजन यांची प्रकृतीही गंभीर आहे. त्यांच्या छातीवर गंभीर दुखापत झाली आहे.