जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार रशिद मलिक (वय 72) यांचे सोमवारी (24 रोजी) रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गफ्फार मलिक यांनी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदही भूषवले होते.
हाजी गफ्फार मलिक यांनी तत्कालीन जळगाव नगरपालिका आणि नंतर जळगाव महापालिकेत नगरसेवकपदासह विविध समितींचे अध्यक्षस्थान भूषविले होते. तत्कालीन आमदार सुरेश जैन यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले मलिक यांनी, सुरेश जैन यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तरी स्वत: पक्ष सोडला नव्हता. यानंतर त्यांना पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले होते.
अल्पसंख्याक चेहरा म्हणून ओळख-
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अल्पसंख्याक चेहरा म्हणून ओळखले जाणारे गफ्फार मलिक यांनी 2014 साली यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. मात्र, ते पराभूत झाले होते. आपल्या भाषणाच्या खास शैलीमुळे ते सुपरिचित होते. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना मलिक यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
हाजी गफ्फार मलिक यांच्यावर आज दुपारी 2 वाजता जळगावात अंत्यसंस्कार होणार आहेत.