जळगाव - जिल्ह्यातील वढोदा वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. या परिसरात मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या ५ जणांना वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे. मात्र, या कारवाईदरम्यान २ जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. संशयित आरोपींना मुक्ताईनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १७ सप्टेंबरला वनकोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडून इतर साथीदारांची माहिती तसेच वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
वढोदा वनक्षेत्रात वनविभागाचे फिरते पथक गस्तीवर होते. यावेळी काही लोक मांडूळ सापाच्या तस्करीच्या प्रयत्नात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा गावालगत असलेल्या एका हॉटेलजवळ सापळा लावला आणि पाच संशयितांना ताब्यात घेतले. यादरम्यान दोन जण पळून गेले. प्रदीप धनराज चव्हाण, प्रवीण अमरदीप खिल्लारे, भागवत सुनील डुकरे, पंकज रामसिंग चव्हाण व अरविंद माणिकराव कांडेलकर अशी संशयित आरोपींची नावे आहेत. संशयित आरोपींकडून मांडूळ जातीच्या सापासह तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. पाचही संशयितांना कुऱ्हा येथील वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई जळगावचे उप वनसंरक्षक व्ही. व्ही. होसिंग, फिरत्या पथकाचे वनाधिकारी राजेंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कुऱ्हा - वढोदा वनक्षेत्रात पट्टेदार वाघ, बिबट्या, अस्वल, चितळ, हरीण, नीलगाय या प्राण्यांचा मोठा अधिवास आहे. या परिसरात कोरोनाच्या काळातही परराज्यातील टोळ्या काळी हळद, नागमणी, दुतोंडी साप, शंखनाद, करंट भांडे, तिलस्मी खडा आदी घेण्यासाठी येत आहेत. या टोळ्या नागरिकांची फसवणूक करतात आणि निघून जातात. यूट्यूबवर बनावट व्हिडिओ अपलोड करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे.