जळगाव - सर्वदूर थंडीचा जोर वाढू लागला आहे. पहाटेच्या वेळी दाट धुके पडत असून सकाळी उशिरापर्यंत धुक्याची चादर नजरेस पडत आहे. गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. थंडीचे प्रमाण वाढू लागल्याने घराबाहेर पडून योगा आणि व्यायाम करणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे.
हेही वाचा - गो एअरची देशातील १८ विमान उड्डाणे रद्द; प्रवाशांना मन:स्ताप
जळगाव जिल्ह्यात यावर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस लांबला. त्यामुळे थंडीचा ऋतूही लांबला होता. नोव्हेंबरच्या अखेरीस थंडी जाणवू लागली होती. मात्र, डिसेंबरच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस पडल्यामुळे वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरणामुळे थंडी ओसरली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढला. आता कमाल तापमान देखील चांगलेच खाली आले आहे. रात्री उशिरा तसेच पहाटेच्या वेळी गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसात थंडीचे प्रमाण अजून वाढण्याची शक्यता आहे.
थंडीचे प्रमाण वाढू लागल्याने सकाळच्या वेळी आल्हाददायक वाटत आहे. थंडीचा ऋतू आरोग्यासाठी चांगला असल्याने सकाळच्या वेळी फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिम, योगा वर्गदेखील फुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - 'या' स्थानकात तिकीट वाटप करून कंगनाचे 'पंगा' प्रमोशन