जळगाव - कोरोना विषाणूचा सर्वत्र धुमाकूळ सुरू आहे. दररोज नवनवे रुग्ण आढळून येत असताना नागरिकांना गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील बहादरपूरचे कवी संजय अमृतकर यांनी अहिराणी बोलीभाषेतील गाण्यातून कोरोनाविषयी जनजागृती सुरू केली आहे. अहिराणी भाषेतील हे गीत सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला चांगले हिट्स मिळत आहेत.
हेही वाचा... कोरोनाशी कर सुरु लढाई..! जनजागृतीसाठी 'ईटीव्ही भारत'चे खास मराठी गीत
सध्या कोरोना विषयीच्या जनजागृतीसाठी अनेक जण वेगवेगळ्या कविता रचत आहेत, गाणी तयार करत आहेत. याच धर्तीवर पारोळा तालुक्यातील बहादरपूर गावातील रहिवासी असलेले कवी संजय अमृतकर यांनीही अहिराणी ग्रामीण बोलीभाषेत एक गीत तयार केले आहे. हे गीत सर्वत्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
'गोष्ट सांगस मी तुम्हले ऐका...' या शीर्षकाखाली असलेल्या या गीतात कोरोना किती भयंकर आजार आहे? कोरोना होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घ्यावी? याविषयी त्यांनी आपल्या गीतातून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.