जळगाव - शासनाच्या आदेशाचे पालन करत ट्रुजेट विमान कंपनीने सोमवारपासून अहमदाबाद ते जळगाव आणि जळगाव ते अहमदाबाद अशी प्रवासी सेवा सुरू केली. या विमानसेवेला जळगावकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करुन सॅनिटायझरचा वापर आणि तोंडाला मास्क लावत नागरिकांनी प्रवास केला.
कोरोनामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून शासनाने विमानसेवा बंद केली होती. मात्र, आता पुन्हा जळगाव विमानतळावरून जळगाव ते मुंबई, जळगाव ते अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू करण्यात आली. 60 सीटर विमानात अहमदाबादवरून जळगावला येण्यासाठी 20 प्रवाशांनी तिकीटे बुक केली होती. त्यातील 13 प्रवाशांनी प्रवास केला. तर, इतरांनी विविध कारणांनी प्रवास नाकारला.
जळगाववरून 12 प्रवासी अहमदाबादला गेले. अहमदाबादवरून जळगावला येण्यासाठी विमानात बसण्यापूर्वी प्रवाशांची तपासणी करण्यात आली. केंद्र शासन, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय तसेच राज्य शासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनांचे पालन करीत हा प्रवास केला गेला. अहमदाबाद ते जळगावसाठी 2 हजार 596 रूपये तिकीट होते.
अहमदाबादवरून जळगावला आलेल्या प्रवाशांचे जळगाव विमान प्राधिकरणाचे व्यवस्थापक सुनील मगरीवाल, महापालिकेचे उपायुक्त, नोडल अधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी स्वागत केले. प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सोबत असलेल्या सामानाचे सॅनिटायझेशन करत मेडिकल फिट असल्याचे अर्ज प्रवाशांकडून भरून घेण्यात आले. जळगावात आलेल्या प्रवाशांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहाण्याच्या सूचना दिल्या गेल्या.