जळगाव - तब्बल ६० दिवसांपासून बंद असलेली शहरातील विमानसेवा येत्या १ जूनपासून सुरू करण्याचे नियोजन स्थानिक विमान प्राधिकरण व विमान कंपनीतर्फे करण्यात आले आहे. त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगीही मिळाली आहे. मात्र, त्यापूर्वी खबरदारी म्हणून फिजिकल डिस्टन्सिंगची रंगीत तालिम व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विमान प्राधिकरणाचे स्थानिक संचालक सुनील मग्गरीवार यांनी याबद्दलची माहिती दिली.
केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार विमान प्राधिकरणाचे स्थानिक संचालक मग्गरीवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची सोमवारी भेट घेऊन उपाययोजनांची माहिती दिली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी जळगाव- मुंबई व जळगाव-अहमदाबाद अशा दोन ठिकाणच्या विमानसेवेला परवानगी दिली.
विमानसेवेशी निगडीत सर्व कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंगसह इतर खबरदारीबाबतची माहिती देऊन त्यांची रंगीत तालिम घेण्यात आली. तसेच राज्य आरोग्य विभाग आणि रेडक्रॉस सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. विमानसेवेशी निगडीत एएआय, एमएसएफ, एअरलाइन्स, जीएचए, एएमसी कामगार यांच्या ६० हून अधिक कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. होमिओकेअर संशोधन केंद्राचे डॉ. सागर सोनवाल यांनी कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम संबंधित माहिती देऊन औषधांचे वाटप केले.
क्वारंटाईनबाबत मार्गदर्शन येणे बाकी -
विमानसेवेच्या माध्यमातून परजिल्ह्यातील व परराज्यातील प्रवाशांना शहरात दाखल झाल्यानंतर क्वारंटाईन होण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे, शहरात दाखल झालेल्या प्रवाशांना होम क्वारंटाईन व्हावे लागेल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता येणे बाकी आहे.
दोन दिवसांपासून बुकिंग सुरू -
विमानसेवा सुरू करण्यासाठी नोंदणीला शनिवारपासूनच सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत २० टक्के बुकिंग झाले आहे. जळगावातून सुरू होणाऱ्या विमानसेवेचे वेळापत्रक अद्याप कंपनीकडून जाहीर करण्यात आलेले नाही, असे ट्रू-जेट विमान कंपनीचे स्थानिक व्यवस्थापक अखिलेशकुमार यांनी सांगितले