जळगाव - शहरापासून काही अंतरावर असलेल्या कुंभारखोरी जंगलात वणवा पेटल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुमारे 8 ते 10 किलोमीटर क्षेत्रात वणवा पेटल्याने वनसंपदेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पहाटे तीनपर्यंत ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
कुंभारखोरी जंगलात साधारण तीन हेक्टर क्षेत्रात वणवा पेटल्याचा प्रकार घडला होता. हा वणवा वाढत जाऊन 8 ते 10 किलोमीटरच्या परिघात पोहोचला. याठिकाणी अग्निशामन बंब पोहोचणे शक्य नसल्याने परिसरातील नागरिकांसह, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, वन्यजीव संरक्षण संस्थेचे पदाधिकारी आग विझविण्यासाठी पुढे आले. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी झाडाच्या फांद्या, माती, या सहाय्याने वणवा नियंत्रणात आणला.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिंह रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, पप्पू ढाके, जगदीश बैरागी, सुरेंद्र नारखेडे, दीपक पाटील, अझीम काझी यांनी परिश्रम घेतले.
आग विझवण्यासाठी जळगाव महापालिकेचा अग्निशामक बंब तसेच जैन इरिगेशनचे अग्निशामक बंबदेखील दाखल झाले होते. दरम्यान, हा वणवा कशामुळे पेटला याचे कारण स्पष्ट झाले नाही. एखाद्याने पेटती बिडी किंवा सिगारेट फेकली असावी, त्यातून झाडांचा पालापाचोळा पेटला असावा, म्हणून आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.