जळगाव - माजी सैनिकाला मारहाण करत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्यासह नऊ जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानंतर आज (मंगळवार) चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उन्मेष पाटील हे चाळीसगावचे विद्यमान आमदार असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे ते उमेदवार आहेत.
टाकळी प्र.चा. भागातील रहिवासी असलेले माजी सैनिक सोनू हिंमत महाजन यांच्यावर तीन वर्षांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली नव्हती. त्यामुळे महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. याप्रकरणी ६ जूनपर्यंत चौकशी करून महाजन यांची फिर्याद नोंदवून घेण्यात यावी व न्यायालयाला अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश खंडपीठाने दिले होते. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून आज या प्रकरणातील नऊ जणांविरुद्ध मारहाण, जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण -
२ जून २०१६ ला संशयित आरोपी मुकुंद कोठावदे, भावेश कोठावदे, भारती कोठावदे, पप्पू कोठावदे, लक्ष्मीबाई कोठावदे, बबड्या शेख, भूषण उर्फ शुभम बोरसे, जितेंद्र वाघ तसेच आमदार उन्मेष पाटील यांनी तक्रारदार सोनू महाजन यांना त्यांच्या घरी शिवीगाळ करत मारहाण केली होती. यावेळी भावेश कोठावदे याने महाजन यांच्यावर तलवारीने वार करत त्यांना गंभीर जखमी केले होते. त्याचप्रमाणे संशयितांनी महाजन यांच्या खिशातून पैसे काढून घेत त्यांच्या पत्नी मनीषा महाजन यांच्या गळ्यातील पोतही हिसकावून नेली होती. आमच्या विरोधात तक्रार करतो म्हणून आमदार उन्मेष पाटील यांनी इतरांना मारहाण करण्यास प्रवृत्त केले, अशी सोनू महाजन यांची तक्रार आहे.