जळगाव - बनावट पावती पुस्तक छापून श्रीराम मंदिराच्या नावे वर्गणी गोळा करणाऱ्या एकाला विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पकडले. गुरुवारी दुपारी जळगाव शहरात हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र भास्करराव सोनवणे (वय 47, रा. घाट रस्ता, चाळीसगाव) असे राम मंदिराच्या नावाने वर्गणी गोळा करणाऱ्या ठगाचे नाव आहे.
काय आहे नेमका प्रकार?
राजेंद्र सोनवणे याने साई चैतन्य बहुउद्देशीय संस्था व विश्व हिंदू परिषदेद्वारा संचलित जळगाव शाखेच्या नावाने वर्गणी गोळा करण्यासाठी बनावट पावती पुस्तक छापले होते. अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी तो या पावती पुस्तकाच्या माध्यमातून पावत्या फाडत होता. शहरातील गोलाणी मार्केटमध्ये श्रीराम मंदिरासाठी एक व्यक्ती देणगी स्वरुपात पावत्या फाडत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी राकेश लोहार यांना मिळाली. त्यांच्यासह राजेंद्र नन्नवरे, देवेंद्र भावसार व इतर कार्यकर्ते दुपारी गोलाणी मार्केटमध्ये आले. त्यांनी राजेंद्र सोनवणे याला या संदर्भात विचारपूस केली. तेव्हा त्याने आपण विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता असून श्रीराम मंदिरासाठी वर्गणी गोळा करत असल्याचे सांगितले. मात्र, श्रीराम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्याचे अभियान संपन्न झाले असतानाही तो निधी समर्पणच्या नावाखाली वर्गणी गोळा करत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडे असलेले वर्गणी पुस्तकही बनावट होते. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी खात्री केल्यानंतर तो विहिपचा कार्यकर्ता नसल्याचे आढळून आले. स्वतःच्या फायद्यासाठी लोकांची फसवणूक करून तो वर्गणी गोळा करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी राकेश लोहार यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र सोनवणे याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान हे जळगाव जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत होते. हे अभियान जळगाव जिल्ह्यात संपन्न झालेले आहे. कोणी जर श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण देणगी मागत असल्यास त्यास देऊ नये, असे आवाहन यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार यांनी केले आहे.