जळगाव - जिल्ह्यात कोरोनामुळे पाचवा बळी गेला आहे. अमळनेर शहरातील एका 66 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी रात्री उशिरा या वृद्धाचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.
अमळनेर येथील शाहआलम नगरातील एका कोरोनाबाधित 66 वर्षीय वृद्धाचा रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या वृद्धाला 24 एप्रिलला कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शाहआलम नगरातील हा दुसरा, तर अमळनेर शहरातील कोरोनाचा हा चौथा बळी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 5 बळी गेले आहेत. दरम्यान, अमळनेर येथील मृत वृद्धाला हृदयविकाराचा त्रास होता. तसेच त्यांचे वजनही वाढलेले होते. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने वृद्धाचा अखेर मृत्यू झाला.
जिल्ह्यात आतापर्यंत 18 जणांना कोरोनाची लागण -
जिल्ह्यात आतापर्यंत 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी अमळनेरातील 13 रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात 18 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 1 रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे, तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असेही डॉ. खैरे यांनी सांगितले.