जळगाव -जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गाची स्थिती चिंताजनक होत असताना आरोग्य यंत्रणेला कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय जामनेरात आला आहे. जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील धारिवाल पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये उभारलेल्या शासकीय कोविड सेंटरमध्ये रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा मिळत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ५० पैकी १५ रुग्णांनी कोविड सेंटरमधून काढता पाय घेतला आहे.
तक्रारींची दाखल नाही
जामनेर शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून धारिवाल पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शासकीय कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. सद्यस्थितीत या कोविड सेंटरमध्ये 50 बाधित रुग्ण दाखल आहेत. मात्र, या सेंटरमध्ये रुग्णांना वेळेवर चहा-नाष्टा, जेवण मिळत नसल्याची रुग्णांची तक्रार आहे. मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा निकृष्ट असतो. पिण्यासाठी पाणी देखील वेळेवर मिळत नाही. सोयीसुविधा चांगल्या मिळाव्यात म्हणून रुग्णांनी अनेकदा आरोग्य यंत्रणेकडे तक्रारी केल्या. परंतु, तक्रारींची दाखल घेतली जात नसल्याने रुग्ण चांगलेच संतप्त झाले. 50 पैकी 15 रुग्णांनी तर थेट कोविड सेंटरमधून काढता पाय घेतला. हे रुग्ण आपल्या नातेवाईकांसोबत दुचाकी तसेच मिळेल त्या वाहनावरून घरी निघून गेले.
हेही वाचा- राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर; केंद्र सरकारचे राज्याला पत्र
सोयीसुविधा तर सोडा, आरोग्य तपासणीही होत नाही
कोविड सेंटरमधील भोंगळ कारभाराबाबत तक्रार करताना काही रुग्णांनी सांगितले की, या सेंटरमध्ये रुग्णांना जेवण, पाणी, स्वच्छता यासारख्या मूलभूत सोयीसुविधा तर मिळतच नाहीतच. परंतु, दररोज रुग्णांची आरोग्य तपासणी देखील केली जात नाही. या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या नर्स, डॉक्टर हे सकाळी आणि संध्याकाळी रुग्णांची हजेरी घेण्यासाठी येतात. मात्र, कोणत्याही प्रकारची आरोग्य तपासणी करत नाही. रुग्णांच्या शरीराचे तापमान किती आहे, ऑक्सिजन पातळी व्यवस्थित आहे किंवा नाही, रुग्णांना गोळ्या-औषधे लागणार आहेत का? या प्रकारची कुठलीही तसदी घेतली जात नाही. धक्कादायक बाब म्हणजे, रुग्ण सेंटरमध्ये दाखल होताना त्याला ज्या गोळ्या देण्यात आल्या आहेत, त्या व्यतिरिक्त नंतर कुणालाही गोळ्या व औषधे देण्यात आलेल्या नाहीत. आरोग्य तपासणी करा, असे सांगितल्यावर नर्स आणि डॉक्टर हे आमच्याकडे साधने नाहीत, असे बेजबाबदार उत्तर देत असल्याचीही तक्रार रुग्णांनी केली.
जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार
कोविड सेंटरमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे यांनी सांगितले की, कोविड सेंटरमध्ये रुग्णांना व्यवस्थित उपचार व सोयीसुविधा दिल्या जात आहेत. परंतु, काही रुग्णांचे असे म्हणणे होते की, आम्हाला होम क्वारंटाईन करावे. मात्र, त्यांचा कोविड सेंटरमधील क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेला नसल्याने आम्ही त्यांना परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना कोरोनाच्या उपचार पद्धतीच्या नियमानुसार गोळ्या व औषधे दिले जात असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. परंतु, काही रुग्णांचे म्हणणे होते की आम्हाला इंजेक्शन दिले पाहिजे, सलाईन लावली पाहिजे. ते नियमानुसार नसल्याने आम्ही तसे करू शकत नाही. दुसरीकडे कोविड सेंटरमधील सोयीसुविधांबाबत रुग्णांनी तक्रारी केल्या. मात्र, गेल्या वर्षभरापासून आपण हे कोविड सेंटर चालवत आहोत. या ठिकाणी आधी जेवण, नाश्ता व पाणी पुरवणारा ठेकेदार आपण पुढे कायम केला आहे. हा ठेकेदार नियमित वेळेनुसार जेवण, नाश्ता या गोष्टी पुरवतो. पण काही रुग्णांना लवकर जेवण मिळायला हवे, अशी त्यांची मागणी होती. त्यानुसार आपण ठेकेदाराला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत, असे डॉ. सोनवणे यांनी सांगितले. दरम्यान, 15 कोरोनाबाधित रुग्ण कोविड सेंटरमधून निघून गेले आहेत. त्यांच्या बाबतीत आपण जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन परत कोविड सेंटरमध्ये आणावे, अशी विनंती पोलीस अधिकार्यांकडे केली आहे. असेही डॉ. विनय सोनवणे यांनी सांगितले.
हेही वाचा- Corona Live Update : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून राज्यात कडक निर्बंध