जळगाव - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी झाली आहे. मात्र, जळगावात रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. रावेरची जागा सोडायला राष्ट्रवादी तयार नसल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून येत असल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. रावेरची जागा काँग्रेसला सोडून तेथे माजी खासदार उल्हास पाटील यांना उमेदवारी द्यावी, या मागणीसाठी शनिवारी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी जळगावात काँग्रेस भवनासमोर उपोषण केले.
आघाडीच्या जागा वाटपाच्या सूत्रात रावेरची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. परंतु, राष्ट्रवादीला याठिकाणी सातत्याने अपयश येत आहे. शिवाय रावेर मतदारसंघात काँग्रेसचे राष्ट्रवादीपेक्षा प्राबल्य आहे. ही बाब लक्षात घेता रावेरची जागा काँग्रेसला द्यावी. याठिकाणी आघाडीचे उमेदवार म्हणून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी उपोषण केले.
अन्यथा आघाडीला फटका बसणार-
रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडली नाही तर, आघाडीला मोठा फटका बसू शकतो. रावेरमध्ये भाजपकडून माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार नाही. मात्र, आघाडीकडून उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली तर याठिकाणी लढत रंगतदार होऊ शकते, अशी प्रतिक्रिया उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांनी दिली.