जळगाव -जिल्ह्यात युरिया खताची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडून युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत युरियाचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी एका कंपनीचा आलेला तीन हजार मेट्रिक टन युरिया हातोहात विकला गेला. जिल्ह्यात आता पुढील आठवड्यात युरियाचा पुरवठा होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून युरियासह इतर खतांची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे. परंतु, कोरोनामुळे खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अडचणी येत असल्यामुळे खतांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून पुरवठा होत नसल्याने जळगावातील बाजारपेठेत खतांची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपूर्वी 20:20:0 आणि 20:20:13 ही खते आली होती. त्यानंतर आरसीएफ कंपनीचा तीन हजार टन युरिया आला होता. परंतु, जिल्ह्यात खतांना मागणी जास्त असल्याने ही खते त्वरित संपली. युरिया खताचा सर्वाधिक तुटवडा जाणवत आहे. प्रत्येक शेतकरी पाच ते सहा युरियाच्या गोणी मागत असल्याने मालपुरवठा करणे विक्रेत्यांना शक्य होत नसल्याची स्थिती बाजारात आहे. बरेच शेतकरी गरज नसताना खताचा साठा करत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तर अनेक विक्रेते लिंकिंग करत खतांची विक्री करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या परिस्थितीकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात कापूस, मका, ज्वारी, बाजरी या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. खरीप हंगामात या पिकांसाठी युरिया खताची मात्रा द्यावी लागते. त्यामुळे युरियाला अधिक प्रमाणात मागणी असते. त्याचप्रमाणे केळी पट्ट्यात देखील युरिया खताला मोठी मागणी आहे. केळी उत्पादक असलेल्या एका शेतकऱ्याला किमान 20 ते 25 गोणी युरिया अपेक्षित आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर युरियाचा साठा पुरवणे विक्रेत्यांना कठीण झाले आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा आणि जळगाव तालुक्यातील काही भागात केळी उत्पादकांकडून युरियाची मोठी मागणी नोंदवली जात आहे. जिल्ह्यात मुळात खतांचा पुरवठा कमी होत असल्याने टंचाई निर्माण झाली आहे.
सद्यस्थितीत जळगाव बाजारपेठेत इतर खते मिळत असली तरी युरियाची मात्र टंचाई निर्माण झालेली आहे. आता सध्या पाऊस सुरू असल्याने पिकांना युरियाची मात्रा देणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर युरिया खत दिले गेले नाही तर पिकांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरिया लवकर मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.