जळगाव - भुसावळसह जळगाव तालुक्यातील वाघूर धरण लाभधारक समितीचे सद्स्य असलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी वाघूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येण्याची मागणी करण्यात आली.
वाघूर धरणासाठी जळगाव आणि भुसावळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी वाघूर लाभधारक म्हणून या शेतकऱ्यांना सिंचनासाठी वाघूर धरणातून आवर्तन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानुसार दरवर्षी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन मिळत होते. मात्र, यावर्षी तापी पाटबंधारे महामंडळाकडून सकारात्मक अहवाल मिळाला असताना जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळाच्या नावाखाली शेतकऱ्यांना आवर्तन नाकारण्यात आले आहे.
वाघूर धरणात पुरेसा जलसाठा असताना आवर्तन नाकारल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. वाघूर लाभधारक समितीचे सदस्य असलेल्या शेतकऱ्यांनी काळ्या फिती लावून जिल्हा प्रशासनाच्या कार्यपध्दतीचा निषेध नोंदवला. या उपोषणात अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. उपोषणानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. तसेच २ दिवसात पाण्याचे आवर्तन न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील समितीच्यावतीने देण्यात आला.