जळगाव - अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत विद्यापीठाच्या चुकीमुळे नापास झालेली विद्यार्थिनी, वर्ष वाया जाऊ नये म्हणून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकडे वळली. याच क्षेत्रात तिला आपल्या करिअरची वाट गवसली. आता ती उपजिल्हाधिकारी म्हणून लवकरच सेवारत होणार आहे. ही कहाणी आहे, मूळची जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जवखेडा या गावाची लेक असलेल्या मानसी सुरेश पाटील हिची. मानसी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिच्या यशोगाथेवर 'ईटीव्ही भारत'ने या विशेष रिपोर्टमधून प्रकाशझोत टाकला आहे...
- राज्यपातळीवर चमकदार कामगिरी-
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सुधारित निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात मानसीने घवघवीत यश मिळवले आहे. ती मुलींमधून राज्यात पहिली आली आहे. तिने 700 पैकी 528 गुण मिळवले आहेत. मानसीने मिळवलेल्या यशामुळे तिच्या कुटुंबीयांसह जळगाव जिल्ह्याचे नाव राज्यात झळकले आहे.
- कौटुंबीक पार्श्वभूमी अशी-
मानसी ही अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील रहिवासी सुरेश पाटील यांची कन्या आहे. सुरेश पाटील हे जळगावात विद्यानिकेतन शाळेत शिक्षक होते. सध्या ते सेवानिवृत्त झाले आहेत. नोकरीच्या निमित्ताने ते जळगावातच स्थायिक झाले. मानसीच्या आई मनिषा पाटील या गृहिणी, मोठी बहीण संयमी पाटील आसनगाव येथे शिक्षिका आहे. तर लहान भाऊ गंगेश पाटील हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे. मानसीने बीई कॉम्प्युटर शिक्षण घेतले आहे. एमपीएससीच्या माध्यमातून ती प्रशासकीय सेवेत दाखल झाली आहे.
- अशी वळली होती स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकडे-
मानसीचे पूर्ण शिक्षण जळगावातच झाले आहे. वडील शिक्षक असल्याने घरात शैक्षणिक वातावरण होते. त्यामुळे बालपणापासून तिला अभ्यासाची गोडी होती. तिचे प्राथमिक शिक्षण अभिनव प्राथमिक विद्यामंदिर येथे, माध्यमिक शिक्षण प. न. लुंकड कन्या शाळेत झाले. जळगावच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये तिने डिप्लोमाचे शिक्षण घेतले. त्यानंतर एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई कॉम्प्युटरची पदवी घेतली. 2014-15 मध्ये अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत मानसी विद्यापीठाच्या चुकीमुळे एका विषयात नापास झाली. त्यामुळे वर्ष वाया जाणार होते. असे होऊ नये म्हणून तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात ज्या विषयात ती नापास झाली होती, त्या विषयाच्या फेरतपासणीत ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. पुढे स्पर्धा परीक्षांचाच अभ्यास करण्याचा तिने निर्णय घेतला.
- दुसऱ्याच प्रयत्नात झाली अधिकारी-
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केल्यावर मानसी एमपीएससीच्या माध्यमातून 2017 मध्ये दुसऱ्याच प्रयत्नात विक्रीकर अधिकारी झाली. तत्पूर्वी 2016 मध्ये तिची विक्रीकर अधिकारी पदाची संधी अवघ्या 2 गुणांनी हुकली होती. पण तिने जिद्द सोडली नव्हती. म्हणून पुढच्या वेळी तिने लागलीच यशाला गवसणी घातली. 2019 मध्ये तिला विक्रीकर निरीक्षक म्हणून नाशिकला नियुक्ती मिळाली. सध्या ती नाशिकलाच विक्रीकर निरीक्षक म्हणून सेवारत आहे. विक्रीकर अधिकारी झाल्यावरही तिचे समाधान झाले नव्हते. तिने नोकरी करत असताना अभ्यास सुरूच ठेवला होता. आता ती राज्यसेवेची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाली असून, लवकरच उपजिल्हाधिकारी होणार आहे.
- राज्य आणि जनतेसाठी खूप काही करायचंय-
प्रशासकीय क्षेत्र हे समाजासाठी चांगलं काम करण्याची एक मोठी संधी असते. मलाही राज्य आणि जनतेसाठी खूप काही करायचे आहे. उपजिल्हाधिकारी म्हणून यापुढे काम करताना जबाबदारी वाढणार आहे, पण जबाबदारीला न्याय देण्याचा आपला सदैव प्रयत्न असेल, अशी भावना मानसीने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली. अभ्यासात सातत्य ठेवले. प्रामाणिक प्रयत्न केले. म्हणूनच मी हे यश मिळवू शकले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांनी देखील सुरुवातीच्या अपयशाने खचून न जाता प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. विशेष म्हणजे, जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत स्वतःला अभ्यासात झोकून द्यावे, असा सल्लाही तिने दिला.
- मानसीच्या कष्टाला फळ मिळाले-
मानसीने मिळवलेल्या यशाने तिचे आई-वडील खूप आनंदी आहेत. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना त्यांना गहिवरून आले होते. 'मानसीने जे कष्ट केले, त्याला फळ मिळाले आहे. बालपणापासून ती हुशार आहे. समंजस आणि स्वभावाने हळवी असलेली मानसीला समाजासाठी चांगले काम करायचे आहे. तिला यापुढेही यश लाभो', अशी भावना तिच्या आई मनिषा यांनी व्यक्त केली. दरम्यान, मुली खरोखर हुशार असतात. हे मानसीच्या यशाने अधोरेखित झाले आहे. आम्ही तिला पाठबळ दिले, म्हणून ती पुढे जाऊ शकली. प्रत्येक पालकाने आपल्या मुलीला असेच पाठबळ दिले तर ती निश्चित आपलं नाव उंचावते. मुलींना कमी लेखू नये, त्यांना आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मानसीचे वडील सुरेश पाटील यांनी यावेळी पालकवर्गाला केले.
- हे छंदही जोपासले-
मानसीला अभ्यासासोबतच अभिनय, वक्तृत्व आणि लिखाणाची आवड आहे. ही आवड तिने कायम जोपासली आहे. चौथीत असताना राज्य बालनाट्य स्पर्धेत तिने अभिनयासाठी व्यक्तिगत प्रकारात राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला होता. पुरुषोत्तम करंडकसारख्या स्पर्धाही तिने गाजवल्या आहेत. प्रसिद्ध लेखक ज्ञानेश्वर गायकवाड लिखित 'भुतांच्या घरात, भुतांची वरात' या नाटकात तिने काम केले आहे. या नाटकाचे एकाच दिवशी 17 प्रयोग तिने केले आहेत, अशी आठवण सुरेश पाटील यांनी सांगितली.
- स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यशोगाथा वाचा खालील लिंकवर क्लिक करून -
हलाखीच्या परिस्थितीत मुलाने UPSC परीक्षेत मिळवलेले यश पाहून वडिलांच्या डोळ्यांत तरळले अश्रू
वाशिम : लाडेगावाच्या शेतकरी पुत्राचा कृषिमंडळ अधिकारी ते युपीएससी असा प्रवास; मिळवला 476वा रँक
UPSC साठी सोडली अमेरिकेतील नोकरी....पाहा देशात 37 वा आलेल्या विनायक नरवडेची यशोगाथा
जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची मुलगी दिव्या UPSC परीक्षेत उत्तीर्ण
UPSC Success Story : वाशिमच्या अनुजाने युपीएससीमध्ये मिळवली देशात 511 वी रँक
UPSC Result: राज्यातून पहिली येणाऱ्या मृणाली जोशीने सांगितले यशाचे गमक