जळगाव - सरकारच्याच नियंत्रणाखाली असलेल्या जळगावातील रेल्वे स्थानक, बसस्थानक तसेच महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांमध्ये नागरिकांकडून लघुशंका आणि शौचासाठी 1 रुपयापासून 10 रुपयांपर्यंतची वसुली करून मोदींच्या प्रयत्नांवर पाणी फिरवले जात आहे. या प्रकारात शौचालयाच्या ठेकेदारापासून मंत्रालयात बसणाऱ्या सर्वांचीच मिलीभगत आहे.
सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व कळावे, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'स्वच्छ भारत अभियाना'ची मुहूर्तमेढ रोवली. हे अभियान यशस्वी व्हावे, म्हणून नरेंद्र मोदींनी हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन ते बालकलाकारापर्यंत सर्वांचीच मदत घेतली. इतकंच काय 'टॉयलेट' - एक प्रेमकथा नावाचा सिनेमा देखील यावर प्रसारित झाला. मात्र, हे प्रयत्न फसल्याचे दिसत आहे.
जळगाव रेल्वे स्थानक, बसस्थानक तसेच महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांमध्ये प्रवासी तसेच नागरिकांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीसंदर्भात वारंवार तक्रारी करूनही सुधारणा होताना दिसत नाहीत. प्राथमिक माहितीवरून, शासकीय नियमानुसार पुरुष अथवा महिला यांच्याकडून लघुशंकेसाठी कोणतेही शुल्क आकारता येत नाहीत. तरी देखील अनेक सुलभ शौचालयांमध्ये लघुशंकेसाठी प्रत्येकी 2 रुपये तसेच शौचालयासाठी 10 रुपयांची सक्तीने वसुली केली जात आहे. याबाबत तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. उलट तक्रारदारालाच धमकावले जात, असल्याचे समोर आले आहे.
शौचालयांमध्ये होणाऱ्या लुटीमुळे नियमित प्रवास करणाऱ्यामध्ये प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक शौचालयामध्ये साधारणपणे २४ तासात 4 ते 5 हजार रुपयांची वसुली केली जाते. हाच आकडा प्रति महिना लाखो रुपयांच्या घरात जातो. शौचालय तसेच लघुशंकेसाठी होणारी शुल्क वसुली म्हणजे एकप्रकारे प्रवाशांच्या खिशाला कात्री आहे.