जळगाव - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत आहे. मात्र, अद्याप कोरोनाची संपूर्ण साखळी तुटलेली नाही. सोमवारपासून (दि. 17) जळगाव जिल्हा प्रशासनाने 'ब्रेक दी चेन' अंतर्गत लागू केलेले निर्बंध आणखी कठोर केले आहेत. सकाळी 7 ते 11 दरम्यानच अत्यावश्यक सेवा खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यातदेखील गर्दी करणारे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. सकाळी 11 नंतर शहरातील संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे शटर डाऊन झाली. रस्त्यांवर अघोषित संचारबंदी पाहायला मिळाली. विनाकारण रस्त्यावर हिंडणाऱ्यांवर पोलिसांनी दंडुका उगारला.
जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी दिला होता इशारा -
जळगावात राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक निर्बंधांची अंमलबजावणी होत आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडत होते. लसीकरणासाठी होणारी अनावश्यक गर्दी, कोरोनाबाधित रुग्णांसोबत दवाखान्यात गर्दी करणारे नातेवाईक, अरुंद गल्ली-बोळांमध्ये बेकायदेशीरपणे भाजीपाला विक्रेते थाटत असलेली दुकाने आणि त्यावर होणारी गर्दी, याशिवाय काही नागरिक सकाळी 7 ते 11 दरम्यान किराणा, भाजीपाला तसेच फळ विक्रीच्या दुकानांवर विनाकारण गर्दी करत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत होते. प्रशासनाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून 31 मे पर्यंत निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला. तसे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले होते. कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू असताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच दिला होता. सोमवारपासून थेट कारवाईला सुरुवात झाली.
हेही वाचा - मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस, वाहतूक सुरूच
11 वाजेनंतर बाजारपेठ केली बंद -
सकाळी 7 ते 11 या वेळेत फळे, भाजीपाला तसेच किराणा मालाची विक्री करणाऱ्या दुकानांना परवानगी आहे. 11 वाजेनंतर शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक, पोलन पेठ, दाणाबाजार, फुले व गोलाणी मार्केट परिसरातील सर्व दुकाने बंद झाली. 11 च्या सुमारास पोलीस व महापालिका प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे बाजारपेठ पूर्णपणे बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वचा - इस्राईल-पॅलेस्टाईन वाद चिघळला; गाझामध्ये तोफ हल्ले सुरू, १००हून अधिक ठार
विनाकारण फिरणाऱ्यांना लाठ्यांचा प्रसाद -
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रशासनाने दिलेल्या वेळेनंतरही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. अशा विनाकारण फिरणार्यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सबळ कारण नसताना बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद दिला. बळीराम पेठ, भिलपुरा चौकात पोलिसांनी बेशिस्त नागरिकांना उठाबशा काढण्याची शिक्षा केली.
उपनगरांमध्ये मात्र, हलगर्जीपणा सुरूच-
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पोलीस व महापालिका प्रशासनाने कडक निर्बंधांची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्याचे दिसून आले. मात्र, खोटेनगर, पिंप्राळा, हरिविठ्ठलनगर, अयोध्यानगर, एमआयडीसी परिसरात नागरिकांचा हलगर्जीपणा पाहायला मिळाला. याठिकाणी तरुणांचे घोळके बाहेर फिरत होते. काही ठिकाणी दुकाने लपूनछपून सुरू होती.