जळगाव - मनपाच्या अतिक्रमण पथकाने रविवारी सकाळपासून कारवाईचा धडाका सुरु केला आहे. शहराच्या बळीरामपेठ, बाजारपेठ व वर्दळीच्या भागात मनपाच्या पथकाने कारवाई केली.
डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा-
चौबे शाळा ते सुभाष चौकापर्यंत तसेच सुभाष चौक ते चित्रा चौक, राजकमल टाकी चौक परिसरात अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. कारवाईदरम्यान रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना, दुकानदारांना हटवण्यात आले. रविवार बाजाराचा दिवस असल्याने या निमित्त शहरातील सुभाष चौक, बळीराम पेठ, घाणेकर चौक, फुले मार्केट परिसर, शनिपेठ, सुभाष चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला असल्याचे दिसून आले. कारवाई पथकात नाना कोळी, नरेन गायकवाड, किशोर सोनवणे, भानुदास ठाकरे, पंकज कोळी, राजु वाघ, सोनवणे, नितीन पाटील आदींचा समावेश होता.
अतिक्रमण पथके रात्रीही तैनात-
या कारवाईदरम्यान घाणेकर चौक, सुभाष चौक रस्त्यांवरील फळ, भाजीपाला विक्रेत्यांना हटकण्यात आले. मनपाचे वाहन पाहून हातगाडीधारक विक्रेते आपल्या हातगाड्या गल्लीबोळात घेवून जात होते. मनपा अतिक्रमण पथक घाणेकर चौकात अतिक्रमण पथकाची गाडी या ठिकाणी अचानकपणे आल्याने एकच भंबेरी या विक्रेत्यांमध्ये उडाली होती. तसेच फुले मार्केटमध्ये एक वाहन आले असता तेथेही तारांबळ उडाली. जो तो आपली हातगाडी व साहित्य घेवून धावपळ करत होता. फळ, भाजीपाला विक्रेते आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे मोठी गर्दी येथे जमली होती. मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे रात्रीही अतिक्रमणाची पथके तैनात करण्यात आली आहेत.
हेही वाचा - मकर संक्रांतीला सुरू होणार अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम