जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना बुधवारी अटक केली आहे. या कारवाईनंतर ईडीने खडसे कुटुंबीयांभोवती कारवाईचा फास आवळला असल्याचे बोलले जात आहे. भोसरी गैरव्यवहार प्रकरणात खडसेंचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचेही नाव आहे. एकूणच ईडीने कारवाईचे पाऊल उचलल्यानंतर खडसेंच्या अडचणीत भर पडली आहे.
खडसेंना द्यावा लागला होता मंत्रिपदाचा राजीनामा -
भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात घेतले जाते. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर खडसेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपने बेदखल केल्यानंतर तब्बल साडेचार वर्षे खडसे राजकीय विजनवासात राहिले. आता त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधल्याने ते पुन्हा एकदा नव्याने राजकारणात सक्रिय झाले आहेत. अशातच त्यांचे जावई गिरीश चौधरींनी ईडीने अटक केली असल्याने खडसे कुटुंबीयांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. एकनाथ खडसे यांची काही दिवसांपूर्वीच भोसरी गैरव्यवहार प्रकरणी ईडीने चौकशी केली होती.
भोसरीतील कथित गैरव्यवहाराचे प्रकरण राहिले सर्वाधिक चर्चेत -
एकनाथ खडसेंच्या बाबतीत भूतकाळात घडलेल्या काही गोष्टींवर एक प्रकाशझोत टाकला. तर भोसरीतील कथित भूखंड गैरव्यवहाराचे प्रकरण सर्वाधिक चर्चेत असल्याचे लक्षात येते. आता याच प्रकरणात त्यांच्या जावयाला अटक झाली आहे. या प्रकरणात खडसेंच्या पत्नी तथा जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांचेही नाव आहे. त्यामुळे पुढे काय घडते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काय होते भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण?
सन 2016 मध्ये एकनाथ खडसे राज्याचे महसूल मंत्री असताना त्यांच्यावर पुण्याजवळील भोसरी येथील भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक 52/2अ/2 मधील 3 एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप होता. हा भूखंड त्यांनी 3 कोटी 75 लाख रुपयांना उकानी नामक व्यक्तीकडून खरेदी केला होता. पुण्याच्या उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले होते. या भूखंडाचा सातबारा हा एमआयडीसीच्या नावावर होता. खडसे यांनी हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात 30 मे 2016 ला तक्रार दाखल केली होती. गावंडे यांच्या तक्रारीवर पोलिसांनी पुढील कारवाई न केल्याने गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने गावंडे यांच्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश लाचलुचपत विभागाला दिले होते. एप्रिल 2017 मध्ये लाचलुचपत विभागाने खडसे, त्यांची पत्नी, जावई आणि उकानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली. चौकशीनंतर एप्रिल 2018 च्या शेवटच्या आठवड्यात लाचलुचपत विभागाने पुण्यातील सत्र न्यायालयात अहवाल सादर केला ज्यात त्यांनी खडसे यांना क्लिन चिट देण्यात आली होती. खडसे यांच्याकडून पदाचा गैरवापर झाला नाही आणि त्यामुळे शासनाचे नुकसानही झाले नाही. असे लाचलुचपत विभागाने त्या अहवालात म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी खडसेंची याच प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे.
कोण आहेत गिरीश चौधरी?
गिरीश चौधरी हे एकनाथ खडसे यांच्या कन्या शारदा खडसे-चौधरी यांचे पती आहेत. काही वर्षांपूर्वी ते परदेशात वास्तव्याला होते. अलीकडे ते भारतात राहत असल्याचे सांगितले जात आहे. खडसे यांनी 2016 मध्ये पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीतील सर्वे क्रमांक 52/2अ/2 मधील 3 एकरचा भूखंड पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप होता. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर गिरीश चौधरी हे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले होते.