जळगाव - जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल (बुधवारी) दुपारी भाजपचा राजीनामा दिला असून ते आता उद्या (शुक्रवारी) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यासाठी खडसे आज (गुरुवारी) दुपारी 1 वाजता मुंबईला जाणार आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर या देखील जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईला रवाना होण्यापूर्वी ते आदिशक्ती मुक्ताईचे सह परिवार दर्शन घेतील, असे बोलले जात आहे.
एकनाथ खडसे यांच्यासोबत काही मोजके समर्थक देखील पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी मुंबईला जाणार आहेत. खडसे हे हेलिकॉप्टरने मुंबईत जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर त्यांचे कार्यकर्ते हे वाहनांनी मुंबईकडे रवाना होतील. मुंबईत प्रवेश सोहळा झाल्यानंतर जळगावात खडसेंचा मोठा स्वागत सोहळा होणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यावेळी खडसेंचे समर्थक मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीत दाखल होतील.
खडसे आज दुपारी 1 वाजता मुंबईला जाणार असल्याने त्यांच्या फार्म हाऊसवर समर्थक जमत आहेत. मुक्ताई साखर कारखान्याच्या आवारात असलेल्या हेलिपॅडवरून खडसे मुंबईला रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते देखील खडसेंच्या भेटीसाठी आले आहेत. खडसेंचे स्वागत केले जात आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंनी एकच बाजू मांडली असून, ते खोटं सांगत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर खडसे आज माध्यमांशी बोलताना फडणवीसांच्या बाबतीत काय प्रत्युत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे.