जळगाव - भाजपने आज रात्री उशिरा आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीतही भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना स्थान दिलेले नाही. त्यामुळे खडसेंचा पत्ता कापल्याचे जवळजवळ स्पष्ट झाल्याची चर्चा जिल्हा आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा - भाजपमध्ये बंडखोरी? यादीत नाव नसतानाही एकनाथ खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज रात्री १४ उमेदवारांचा समावेश असलेली दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत खडसेंच्या नावाचा समावेश नव्हता. त्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे खडसेंना दुसऱ्या यादीत स्थान मिळेल किंवा नाही, याची प्रचंड उत्सुकता होती. मात्र, ही यादी जाहीर झाल्यानंतर खडसेंसह त्यांच्या समर्थकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. भाजपकडून आता आपली तिसरी आणि अंतिम यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत खडसेंना स्थान दिले जाते का? याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - 'षडयंत्र रचणाऱ्याला खडसेंनी समोर आणावेच'
दुसऱ्या यादीतही डावलले गेलेले एकनाथ खडसेंना आता तिसऱ्या यादीची वाट पाहण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. तिसऱ्या यादीतही स्थान मिळाले नाही तर खडसे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, खडसेंऐवजी त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, विद्यमान उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, युवा कार्यकर्ते श्रीकांत महाजन यांच्या नावांची चर्चा आहे. पण, रोहिणी खडसेंचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - खडसेंना डावलल्याने लेवा समाज आक्रमक; भाजप पक्षश्रेष्ठींचा नोंदवला निषेध