जळगाव- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते शनिवारी रात्री उशिरा आपल्या समर्थकांसह जळगावात परतले होते. खडसे यांच्या समर्थकांनी त्यांचे जळगावात जल्लोषात स्वागत केले. शनिवारी रात्री ते आपल्या जळगावातील निवासस्थानी मुक्कामी थांबले. आज (रविवारी) सकाळी साडेनऊ वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. तेथे त्यांचा जंगी स्वागत सोहळा पार पडला आहे. त्यानंतर ते दुपारी मुक्ताईनगरला रवाना होणार आहेत.
एकनाथ खडसे शनिवारी सकाळी मुंबईहून खासगी वाहनाने जळगावच्या दिशेने निघाले होते. या प्रवासात त्यांचे ठिकठिकाणी समर्थक तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी झालेले स्वागत स्वीकारत खडसे रात्री साडेअकरा वाजेनंतर जळगावात आपल्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी समर्थकांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत त्यांचे स्वागत केले. समर्थकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन केले.
आज सकाळपासून खडसेंच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने जमले आहेत. दरम्यान, भाजपला रामराम ठोकल्यानंतर खडसे आज प्रथमच राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाले आहेत. आता ते काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.