जळगाव - 'भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्त्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता. आता गळा काढण्यात अर्थ नाही', अशा खोचक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या तथा जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी भाजपाला टोला लगावला आहे. या विषयासंदर्भात त्यांनी आज आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केले असून, त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
भाजपाचा आक्रमक पवित्रा
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. त्यानंतर राज्यात काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधीपक्ष भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणारे ट्विट केले आहे.
काय आहे नेमके ट्विट?
'भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्त्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता. आता गळा काढण्यात अर्थ नाही', अशा स्वरूपाचे ट्विट अॅड. रोहिणी खडसेंनी केले आहे.
नणंदेला भावजयीकडून प्रत्युत्तर
ओबीसीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. रोहिणी खडसेंनी भाजपाला लक्ष्य करणारे ट्विट केल्यानंतर, त्यांच्या भावजयी म्हणजेच भाजपाच्या खासदार रक्षा खडसेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. खडसे गुरुवारी दुपारी भाजपाच्या बैठकीसाठी जळगावात आल्या होत्या. 'भाजपाने जर ओबीसींचा विचार केला नसता तर कदाचित आमच्यासारख्या ओबीसी नेत्यांना संधी मिळाली नसती. त्यांनाही भाजपाने विधानसभेची संधी दिली नसती', अशा शब्दांत रक्षा खडसेंनी रोहिणी खडसेंचा मुद्दा खोडून काढला.
हेही वाचा - राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका; घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे