जळगाव: भोसरी भूखंड प्रकरणी (pune bhosri land scam) पुन्हा चौकशी म्हणजे कुठे ना कुठे मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी केला आहे. मला गुन्ह्यांमध्ये अडकवल्यानंतरच विरोधकांसाठी निवडणूका सोप्या जातात, असा टोलाही खडसेंनी विरोधकांवर लगावला आहे.
काय म्हणाले खडसे? : पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की, अँटी करप्शन कडून पूर्णपणे चौकशी होऊन याचा क्लोजर रिपोर्ट दोन वर्षांपूर्वी न्यायालयात सादर करण्यात आला होता. आता मात्र राज्य सरकारने आपल्याच तपासणी अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत पुन्हा चौकशी अहवाल सादर केला आहे. यामध्ये प्रकरणात कुठलेही तथ्य नसून आपण यात निर्दोष असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हंटले आहे.
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम: महाराष्ट्रात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन खरीप पिके शेतकऱ्यांच्या हातात आलेली नाही. अशा स्थितीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून शेतकऱ्यांची टिंगल उडवली जात असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कृषिमंत्री अब्दुल सत्तार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकतर शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर करा अन्यथा शेतकऱ्यांची टिंगल तरी करू नका असेही एकनाथ खडसे यांनी कृषिमंत्र्यांना सुनवले आहे.
काय आहे भोसरी भूखंड प्रकरण: एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ३१ कोटी रुपये किंमत असलेली जमीन फक्त ३.७ कोटी रुपयांना विकल्याचा दावा करण्यात आला होता. Pune bhosari land scam त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्र्हे क्र 52 2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली आहे.
ईडी चौकशी: नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद करण्यात आली आहे. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत, असेही आरोप त्यांच्यावर आहेत. या व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडून आलेला पैसा वापरल्याचे कागदोपत्री निष्पन्न झालेलं आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचं सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने ईडी चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली होती. एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती.