जळगाव - आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील ६ जागांसाठी काँग्रेस आग्रही राहणार आहे. याबाबत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस तथा माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी काँग्रेसच्यावतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेसाठी डॉ. बच्छाव जळगावात आल्या होत्या. मुलाखत प्रक्रिया आटोपल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. डॉ. बच्छाव पुढे म्हणाल्या की, यापूर्वी आघाडीच्या सूत्रात काँग्रेसच्या वाट्याला जळगाव शहर, अमळनेर, जामनेर आणि रावेर या ४ जागा होत्या. परंतु, आता आम्हाला जळगाव ग्रामीण आणि चोपडा या २ जागा वाढवून पाहिजे आहेत. तशी कल्पना आम्ही मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला देणार आहोत. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते याबाबतचा अंतिम निर्णय घेतील. निवडणुकीत निवडून येतील, अशा उमेदवारांची नावे वरिष्ठ पातळीवर पाठवली जातील, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, पक्षातील गटबाजी, महापालिकेनंतर लोकसभा निवडणुकीतील अपयशाबाबत त्यांनी बोलणे टाळले.
४५ इच्छुकांनी दिल्या मुलाखती-
मुलाखत प्रक्रियेत जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातून ४५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. एकेका मतदारसंघातून ३ ते ४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. दिवसभर ही प्रक्रिया सुरू होती.