जळगाव- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूर्णवेळ अधिष्ठाता म्हणून डॉ. जयप्रकाश रामानंद हे आज दुपारी रुजू झाले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी स्वागत केल्यानंतर त्यांनी अधिष्ठाता म्हणून कार्यभार स्वीकारला. डॉ. रामानंद यांच्या नियुक्तीचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी काढले आहेत.
भुसावळ येथील 82 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी यापूर्वी अधिष्ठाता म्हणून काम पाहणारे डॉ. भास्कर खैरे यांना निलंबित करण्यात आल्यानंतर रिक्त जागी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. रामानंद हे यापूर्वी कोल्हापूर तसेच धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. त्यांची जळगावातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांना धुळ्यातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. आता ते जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून पूर्णवेळ कार्यभार सांभाळतील.
दरम्यान, पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी सर्वात आधी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात सखोल चर्चा केली. त्यानंतर पदाचा कार्यभार सांभाळला. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे, ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तसेच कोरोनाचा वाढता मृत्यूदर कसा रोखाल? यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती निश्चितच गंभीर आहे. मृत्यूदर देखील राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे येथे सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे लागणार आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी तसेच यंत्रसामुग्री कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
त्यामुळे सहकारी टीमसोबत झोकून देऊन काम करण्यावर भर दिला जाईल. यापुढे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, तसेच वाढलेला मृत्यूदर कमी करणे, ही दोन प्रमुख उद्दिष्टे आपल्यासमोर आहेत. त्याचप्रमाणे, वैद्यकीय महाविद्यालयाची विस्कटलेली घडी बसवू, असा विश्वास डॉ. रामानंद यांनी बोलताना व्यक्त केला.