जळगाव - कोरोना विषाणूचा सर्वत्र धुमाकूळ सुरू आहे. अशा कठीण परिस्थितीत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि ब्रदर्स आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा बजावत आहेत. कोरोना संसर्ग होण्याची भीती मनातून दूर सारत ते अखंड रुग्णसेवेची जबाबदारी तर निभावत आहेतच, शिवाय राष्ट्रहिताच्या कार्यालाही हातभार लावत आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीत आपले आणि कुटुंबीयांचे काय होईल? हा प्रश्न त्यांच्याही मनात आहेच.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा चीनमधून उद्रेक झाला. पाहता पाहता कोरोनाने अख्खे जग कवेत घेतले आहे. भारतातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. या राष्ट्रीय आपत्तीला दूर सारण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. त्यात डॉक्टर्स, नर्स, ब्रदर्स यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे घटक असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मोलाचा वाटा आहे. हे सारे जण आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढा देत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह तसेच संभाव्य कोरोना रुग्ण सातत्याने आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण पडतो आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर्स, नर्स आणि ब्रदर्स यांच्या कामाचे तासदेखील वाढले आहेत. त्यांच्या कामाचे तास एरवी 8 ते 12 तास असायचे. परंतु, आता हेच कामाचे तास 16 ते 18 तास झाले आहेत. अशा कठीण परिस्थितीत त्यांना कौटुंबिक जबाबदारी सांभाळून रुग्णसेवेची धुराही सांभाळावी लागत आहे. कोरोना पॉझिटिव्ह तसेच संभाव्य कोरोना रुग्णांच्या सान्निध्यात राहावे लागत असल्याने प्रत्येक डॉक्टर, नर्स तसेच ब्रदर्सला स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्यावी लागत आहे. कोरोनाचे सावट असतानाही रुग्णसेवा करणाऱ्या घरातील कर्त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर? अशी भीती त्यांच्या कुटुंबीयांना आहे.

आधी रुग्णसेवा महत्त्वाची -
आम्हाला कुटुंबाची काळजी तर वाटतेच; परंतु, आपण रुग्णसेवेचा विडा उचलला आहे, तर आधी रुग्णसेवा महत्त्वाची मग कुटुंब, अशाही प्रतिक्रिया काही डॉक्टर्स तसेच नर्स यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या. कोरोनाची भीती वाटते. पण काळजी घ्यावी लागते. कारण आपण निरोगी राहू तरच रुग्णांना चांगली सेवा देऊ शकतो. म्हणून कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण न घेता काम करण्यावर भर देतो, असेही काहींनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या लढ्यात पोलीस आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी आपले योगदान देत असताना नागरिकांनी फक्त घरातच बसून लॉकडाऊन पाळावे, एवढी माफक अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.

कुटुंबीयांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क -
काही डॉक्टर्स तसेच इतर कर्मचारी नोकरीच्या निमित्ताने कुटुंबीयांपासून लांब आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीमुळे ते कुटुंबीयांना भेटायलादेखील जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत आहेत. दुसरीकडे, जे डॉक्टर्स, नर्स आणि ब्रदर्स शहरातच वास्तव्याला आहेत, ते कोरोनाच्या भीतीमुळे थेट कुटुंबीयांशी जवळीक साधू शकत नाहीत. ड्युटी करून वेळ मिळेल तेव्हा घरी आल्यावर त्यांना आपल्या घरात देखील कुटुंबीयांपासून 'सोशल डिस्टन्स' पाळावे लागत आहे.