जळगाव - भाजप पक्षांतर्गत निवडणुकीत जळगाव महानगराध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी यांची वर्णी लागली आहे. या निवडणुकीत सुरुवातीपासून नाराजी नाट्य रंगले होते. मात्र, इच्छुकांची समजूत काढण्यात नेतेमंडळी यशस्वी झाल्याने अखेर महानगराध्यक्षपद निवडीचा तिढा सुटला. महानगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये असलेल्या ५ अन्य पदाधिकाऱ्यांनी चर्चेअंती माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी विजय साने, माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, महापौर सीमा भोळे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत महानगराध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. महानगराध्यक्षपदासाठी नगरसेवक सुनील खडके, उदय भालेराव, सुनील माळी, चंद्रकांत बेंडाळे, दीपक सूर्यवंशी, प्रा. डॉ. अस्मिता पाटील या इच्छुकांनी दावेदारी केली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रा. अस्मिता पाटील यांनी जाहीर माघार घेतली. अन्य पाच जणांपैकी कुणीही माघार घेण्यास तयार नसल्याने संघटनमंत्री आणि इच्छुकांनी स्वतंत्रपणे चर्चा करून निर्णय घेतला. तिढा सुटत नसल्याने अखेर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून मार्ग काढत दीपक सूर्यवंशी यांच्यासाठी अन्य पाच जणांना माघार घेण्यास सांगितले.
गटबाजी विरहीत चेहरा म्हणून संधी -
निवडणूक काळात आवर्जुन एकत्र येणारे आणि आपण दोन्ही एकच असल्याचा दावा करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांचे भाजपमध्ये स्वतंत्र गट आहेत. दोन्ही गटामध्ये अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार होते; परंतु दीपक सूर्यवंशी हे दोन्ही गटापासून लांब आणि दोन्ही गटांना चालणारे असल्याने त्यांच्या नावावर दोन्ही गटाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. दोन्ही गटांना त्यांच्या नावावर अडचण नसल्याने त्यांच्या नावासाठी नेत्यांचा आग्रह होता. पक्ष विरोधात असताना कोणत्याही एका गटाचे पक्ष संघटनेमध्ये वर्चस्व असू नये, यासाठी पक्षाने ही काळजी घेतल्याचे बोलले जात आहे.