जळगाव - जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील जुनोने येथे शेतात मक्याची कोंब आलेली कणसे खाल्ल्यामुळे ३५ मेंढ्या दगावल्याची घटना घडली. अद्यापही ४० मेंढ्या अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले जात आहेत.
हेही वाचा- 'शिवसेनेशिवाय राज्यात सरकार नाही व मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच'
बोदवड तालुक्यातील जुनोने येथील रहिवासी नारायण जगदेव येळे व त्यांचे सहकारी जुनोने शिवारात सोमवारी (दि. १८) मानसिंग पाटील यांच्या शेतात ३५० मेंढ्या चारत होते. या मेढ्यांनी मक्याची कोंब आलेली कणसे खाल्ली होती. त्यामुळे रात्रीतून ३५ मेंढ्या दगावल्या. हा प्रकार समोर आल्यावर तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. ३५ मेंढ्या दगावल्याने सुमारे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले. अद्यापही ३५ ते ४० मेंढ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवत असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
विषबाधा झाल्याने घडला प्रकार-
मक्याच्या कणसांमुळे मेंढ्यांना विषबाधा झाल्याचे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डॉ. नीलकांत पाचपांडे यांनी सांगितले. विषबाधा झालेल्या मेंढ्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीत नुकसान झाल्याने आपल्याला त्वरित सरकारी मदत मिळावी, अशी अपेक्षा मेंढपाळ जगदेव येळे यांनी व्यक्त केली.