जळगाव - शहरातील पिंप्राळा उपनगरातील मयूर कॉलनीत राहणाऱ्या योगिता मुकेश सोनार (वय ३९) यांचा शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास कुऱ्हाडीने डोक्यात वार करत खून झाला होता. हा खून त्यांचे दीर दीपक लोटन सोनार (वय ३८) याने केला होता. दरम्यान, या घटनेनंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दीपकवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला शनिवारी न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा रुग्णालयात तणाव-
या खुनाच्या गुन्ह्यात मयत योगिता यांची सासू, नणंद व तिचा पती तसेच भाचा हे सुद्धा सामील आहेत, असा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी योगिता यांच्या नातलगांनी शनिवारी केली. योगिता यांच्या पतीच्या प्रॉपर्टीच्या सातबारा उताऱ्यावर परस्पर नावे टाकणाऱ्या पिंप्राळा येथील तलाठ्यावरही गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी नातलगांनी केली आहे. अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी समजूत काढली. दोन ते तीन तासानंतर गोंधळ शांत झाला. नंतर मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला.
पिंप्राळा येथील मयूर कॉलनीत योगिता सोनार या सासू प्रमिला, मुलगा आर्यन व दीर दीपक यांच्यासह वास्तव्यास होत्या. शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर दीर दीपक हा प्रॉपर्टीचे कागदपत्र पाहत होता. त्यावेळी दीपक याचा योगिता यांच्याशी वाद झाला आणि त्याने पलंगा मागून कुऱ्हाड काढत वहिनीच्या डोक्यात मारली. यात योगिता यांचा जागीच मृत्यू झाला होता. रात्रीच दीपकला अटक करण्यात आली होती.
रात्री मुलाने दिली तक्रार-
शुक्रवारी रात्री खुनाची घटना घडल्यानंतर रात्री उशिरा मयत योगिता यांचा मुलगा आर्यन याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दीपकवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. शनिवारी दीपक याला रामानंदनगर पोलिसांनी न्यायालयात हजर केले. सुनावणीअंती त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.