जळगाव - तालुका पुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार केल्याच्या रागातून एका रेशन दुकानदाराने ग्राहकासह त्याच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केली. ही घटना जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वडगाव तिघ्रे येथे घडली आहे. याप्रकरणी ९ जणांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण? -
शासकीय नियमाप्रमाणे एका व्यक्तीस ५ किलो धान्य मिळत आहे. त्यात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत दिला जात आहे. असे असतानाही वडगाव तिघ्रे येथील रेशन दुकानदार मधुकर ओंकार मोरे हा फक्त ३ किलो धान्य देत असल्याची तक्रार वडगाव तिग्रे येथील रहिवासी अमृत दिनकर गव्हाळे यांनी जामनेर तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने, जामनेर पुरवठा कार्यालय येथील २ कर्मचाऱ्यांनी रेशन दुकानाची तपासणी केली. त्यानंतर रेशन दुकानदार मधुकर मोरे याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांनी अमृत गव्हाळे यांच्यासह त्यांचे आई-वडील तसेच भावाला शिवीगाळ करत जबर मारहाण केली. यात अमृत गव्हाळे व त्यांच्या आईच्या डोक्याला दुखापत झाली.
जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-
याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गव्हाळे यांच्या जबाबानंतर पोलिसांनी ॲट्रॉसिटी अॅक्टचे कलम देखील वाढवले आहे.