जळगाव - अंमळनेर येथील प्रसिद्ध डॉक्टर निखील बहुगुणे यांच्या मुलाचे ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी ६ आरोपींकडून अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी अंमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
महेश विनायक खांजोळकर, भटू हिरामण खांजोळकर, सुनील विनायक बारी, शुभम गुलाब शिंगावे, अनिल नाना भील आणि भरत दशरथ महाजन अशी जन्मठेप ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.
अंमळनेर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर निखिल रमेश बहुगुणे यांचा मुलगा पार्थ बहुगुणे याचे ३ जानेवारी २०१७ ला ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी ६ आरोपींनी अपहरण केले होते. याप्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अंमळनेर पोलिसांनी लगेच तपासचक्रे फिरवली होती. पोलीस कारवाईच्या भीतीने आरोपींनी दोन दिवसानंतर पार्थला अज्ञातस्थळी सोडून दिले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. याप्रकरणी अंमळनेर पोलिसांनी अंमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात परिस्थितीजन्य पुरावे तसेच तक्रारदार आणि अन्य साक्षीदारांनी आपल्या साक्षीदरम्यान दिलेल्या माहितीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन वर्षात खटल्याचा निकाल लागला.